हजारमाची... जगाच्या नकाशावर पोचलेले गाव

मुकुंद भट
गुरुवार, 17 जानेवारी 2019

ओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे विद्यापीठ आकाराला येत असल्यामुळे हजारमाची (ता. कऱ्हाड) हे गाव जगाच्या नकाशावर आलेले आहे. या केंद्रामुळे जगभरात होणाऱ्या भूकंपाचे पूर्वानुमान शक्‍य होणार आहे.

येथून एक किलोमीटर अंतरावर सदाशिवगडाच्या पायथ्याजवळ असणारे हजारमाची हे गाव ऐतिहासिक, विज्ञान, शेती, क्रीडा, उद्योग आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहे.

सदाशिवगडाचा वापर शिवकाळात टेहेळणी नाका म्हणून प्रामुख्याने केला जात असे. शिवरायांनी या गडकोटास भेट देऊन हिंदवी स्वराज्याची पाहणी केली होती. सदाशिवगडावर मावळा प्रतिष्ठान व शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने राज्यस्तरीय पहिले दुर्ग संमेलन झाले. मावळा प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून गडावर जाण्यास सुमारे एक हजार पायऱ्या बांधल्या आहेत. भाविक, पर्यटकांसाठी २२ लाख रुपयांची पाणीयोजना प्रगतिपथावर आहे. शिवस्मारक, कलादालन, नक्षत्र उद्यान प्रस्तावित आहे. सदाशिवगडास पर्यटन, तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्गाच्या दर्जाची प्रतीक्षेत आहे. यामुळे हे गाव पूर्वी प्रसिद्ध होते. मात्र, आता येथे आंतरराष्ट्रीय भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे विद्यापीठ आकाराला येत असल्यामुळे या गावाची नव्याने वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 

कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मिती हा सातारा जिल्ह्यातील दुसरा व तीन लाख रुपये खर्चाचा आणि कमी काळामध्ये तयार झालेला महत्त्वाकांक्षी प्रकल्पही हजारमाचीत आहे.

आतापर्यंत या प्रकल्पात सुमारे चार हजार किलो शेती उपयोगी गांडूळ खताची निर्मिती झाली आहे. कचऱ्याची समस्या दूर करून गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा हजारमाची ग्रामपंचायतीचा निर्धार आहे. यामुळेही हे गाव प्रसिद्ध झालेले आहे. नाकाने बासरी व डोक्‍याने कॅसिओ वाजवून सुरेल भावगीते व देशभक्तिपर गाणी सादर करणारा अंध कलावंत पोपट पोळ याच परिसरातील असून, लोकांना आपल्या कलेतून मंत्रमुग्ध करत असतो. अंध युवक सुनील फडतरे यांच्या मार्गदर्शनाखालील हुतात्मा अपंग संस्थेने कळसूबाईचे अवघड शिखर त्यांच्या ५० सदस्यांनी सर केले आहे. अंध, दिव्यांगाची संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे.

हजारमाची ग्रामपंचायतीचा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा निर्धार आहे. हजारमाची व विरवडे हद्दीत ओगलेवाडी आहे. गावाच्या हद्दीजवळून गुहागर- विजापूर व कऱ्हाड- तासगाव असे दोन राष्ट्रीय महामार्ग नव्याने होत असून, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि युवकांकडून विकासाची सर्वांगीण वाटचाल होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hajarmachi Village