गावोगावी कडाडते  महादेवची हलगी... 

संदीप खांडेकर 
बुधवार, 15 जानेवारी 2020

महादेव संभाजी साठे हलगी वादनात मास्टर. शाळेची पायरी तो सातवीपर्यंतच चढला. गड्याचे शाळेतल्या फळ्यावर ध्यान कधी लागलंच नाही. वडील संभाजी साठे यांच्या सोबतीला तो जायचा. याच्या डोक्‍यात फक्त हलगी वादनाचं खुळ बसले होते. घरातल्या ताटांवर याचा हात भारी चालत होता.

महादेव संभाजी साठे हलगी वादनात मास्टर. शाळेची पायरी तो सातवीपर्यंतच चढला. गड्याचे शाळेतल्या फळ्यावर ध्यान कधी लागलंच नाही. वडील संभाजी साठे यांच्या सोबतीला तो जायचा. याच्या डोक्‍यात फक्त हलगी वादनाचं खुळ बसले होते. घरातल्या ताटांवर याचा हात भारी चालत होता.

त्याचा आवाज परिसरात घुमायचा. शाळेत पोतराजाचं पात्र रंगवण्यात तो कमी पडायचा नाही. त्याच्या या कलाकारीने शाळेला बक्षीसही मिळायचं. पाचवीत असल्यापासूनचा हलगी वादनाचा नाद त्याच्या अंगात भिनलाय. हलगी वादनाची सुपारी आल्यावर मानधनाचा आकडा सांगणे त्याला जमत नाही. हातावर रक्कम पडेल तेच मानधन, असा त्याचा साधा व्यवहार आहे. 

राधानगरी तालुक्‍यातल्या ठिपकुर्लीत संभाजी साठे यांचे घर. गावात त्यांच्या हलगी वादनाचा बोलबाला होता. परंपरेने त्यांच्या घराण्यात हलगी वादनाचा ठेका आला होता. साठे यांच शाळेत डोकं कधी चाललं नाही. कशीबशी पाचवीपर्यंत त्यांनी मजल मारली. शेतीचा तुकडा सात-आठ एकरचा होता. घरातील अठराविश्व दारिद्रय जायला तयार नव्हतं. काळ्या जमिनीत राबणारी माणसं त्यांच्याकडे नव्हती. भात व ऊस पीक कसं बसं घेण्यात त्यांच शरीर झिजायचं. 

प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी साठे हलगीवर हात घुमवायचे. गावोगावच्या जत्रा, वराती, मिरवणुकांत त्यांची हलगी कडकडायची. थोरला मुलगा सदाशिव, मुलगी तारा, चंद्रा व धाकटा महादेव ही त्यांच्या संसारात फुललेली फुलं. सदाशिव आठवी, तारा नववी, चंद्रा सातवीपर्यंत शिकली. धाकट्या महादेवचे पाय साठे कुटुंबीयांना पाळण्यातच दिसले होते. गड्याच्या मेंदूत शिक्षणातलं अक्षर काही घुसत नव्हतं. शाळेतून त्याच्या हाणामारीच्या तक्रारी कधी झाल्या नाहीत. 

केवळ अभ्यासातील दुर्लक्षाकडे त्याच्या शिक्षकांनी कुटुंबीयांचे लक्ष वेधलं. पाचवीपासूनच वडिलांच्या परंपरेचा धागा ओढण्यात त्याला इंटरेस्ट राहिला. घरातील ताट्या वाजवूनच त्याने हलगी वादनाचा सराव केला. वडिलांनी कान पकडून शिक्षणाचा त्याच्याकडे हट्ट धरला. महादेव त्यांच्या ऐकण्यापलीकडे होता. सातवीत शाळेला सोडचिठ्ठी देऊन तोही गावोगावच्या सुपाऱ्या घेत हलगी वादनाचा कार्यक्रम करू लागला. संजय कांबळे यांच्या गृपमध्ये तो हलगी वादन करतो. 

कोल्हापुरातल्या मर्दानी आखाड्यात त्याच्या हलगी वादनाला शाबासकी मिळाली. मुंबई, पुणे, सातारा, सांगलीतील कार्यक्रमात त्याने हलगी वादनातील झलक दाखवली. आजही त्याचा हलगीवरचा हात थकत नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी तो वडिलांना पोरका झाला. घरच्या शेतीची जबाबदारी भाऊ सदाशिव व त्याच्यावर पडली. 

शेतीकामात अंग मोडून काम करण्यात त्याला आनंद मिळतो. हलगीची सुपारी मिळाल्यावर त्याचा हुरूप वाढतो. अंगातील कला लोकांना दाखवून शाबासकी मिळवणे पुरस्कारापेक्षा मोठे आहे, असे तो मानतो. त्याच्या सुपारीचा आकडा कधीच सांगितला जात नाही. लोक जे पैसे हातावर ठेवतील ते त्याला लाख मोलाचे वाटतात. वडीलानंतर त्याच्या कौशल्याचे आईला मोठे अप्रूप. महादेव घराण्याचं नाव करतोय, असं तिला वाटायचं. काही दिवसांपूर्वी ती जग सोडून गेली. तिच्या जाण्यानं महादेववर दुःखाचं आभाळ कोसळलं. यातून सावरण्यासाठी हलगीशी असलेली मैत्री मदत करेल, असे तो सांगतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: halagi skill of Mahadev Sathe