बेळगाव : ‘बायपास’चे काम पुन्हा रेटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मच्छे परिसरात सुरू असलेले काम.

बेळगाव : ‘बायपास’चे काम पुन्हा रेटले

बेळगाव - दोन दिवसांपासून बंद ठेवलेले बायपासचे काम आजपासून पुन्हा एकदा जोरात सुरू केल्याने पुन्हा एकदा महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘झीरो पॉइंट’ निश्‍चित झाल्याशिवाय काम सुरू करू नये, अशी स्पष्ट सूचना न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणाला केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. तसेच, अनेक शेतकऱ्यांनी स्थगिती मिळाल्यावर बायपासच्या मार्गावर ऊस व इतर पिकांची लागवड केली होती. परंतु, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता मंगळवार (ता. २६) पासून प्रचंड प्रमाणात पोलिस बंदोबस्तात बायपासचे काम हाती घेतले होते. तसेच, काम लवकर पूर्ण व्हावे, रात्रीही यंत्रे लावून काम सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच न्यायालयाचा आदेश डावलून काम सुरू केल्याबद्दल न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

त्यामुळे बायपासचे काम बंद राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. तसेच, गुरुवारी (ता. २८) बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबत लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवस बंद ठेवलेले काम पुन्हा जोरात सुरू झाले आहे. सपाटीकरण करण्यासह इतर कामे सुरू आहेत. प्राधिकरणाकडून न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

लढा तीव्र करण्याचा इशारा

बायपासच्या कामासाठी सपाटीकरण करण्याबरोबरच पूल उभारण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. काम पुन्हा बंद होऊ नये, या दृष्टिकोनातून महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. त्यामुळेच काम वेगाने सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.