या ठिकाणाहून हापूस सांगलीत दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आपल्याकडील हंगामापूर्वी चार महिने तिथे आंबा पिकतो. त्यामुळे तेथून तो थेट भारतात आयात केला जातो. मुंबई - पुणेमध्ये नुकताच मालवी देशातील हापूस आंबा दाखल झाला  .

सांगली - आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप तीन-चार महिने बाकी असताना सांगलीच्या बाजारात दक्षिण आफ्रिका खंडातील मालवी देशातील हापूस दाखल झाला आहे. विष्णू अण्णा फळ मार्केटमधील मुसा आबालाल बागवान यांच्या दुकानात आंब्याच्या पंधरा पेट्या दाखल झाल्या. पहिल्याच सौद्यामध्ये डझनाच्या पेटीला 2500 रूपये इतका दर मिळाला.

दक्षिण आफ्रिका खंडातील मालवी देशातील वातावरण आपल्याकडील कोकण सारखे आहे. त्यामुळे तिथे रत्नागिरी, देवगड परिसरातील हापूस आंब्याचे कलम नेऊन संशोधन करून यशस्वी लागवड करण्यात आली आहे. तेथे देखील तो हापूस नावाने ओळखला जातो. आपल्याकडील हंगामापूर्वी चार महिने तिथे आंबा पिकतो. त्यामुळे तेथून तो थेट भारतात आयात केला जातो. मुंबई - पुणेमध्ये नुकताच मालवी देशातील हापूस आंबा दाखल झाला  .

हापूसच्या एक डझनाच्या 15 पेट्या दाखल

सांगलीतील खवय्यांना या आंब्याची चव चाखता यावी यासाठी फळ मार्केटमधील मुसा बागवान यांच्या दुकानात मालवीतील हापूसच्या एक डझनाच्या 15 पेट्या मागवण्यात आल्या आहेत. चवीला आपल्याकडील हापूससारखाच असलेला आंबा मुंबई - पुणे परिसरात प्रसिद्ध आहे. सांगलीत यंदा प्रथमच हा आंबा दाखल झाला आहे. हंगामापूर्वी तीन-चार महिने दाखल झाला. त्यामध्ये एक डझनाच्या पेटीला 2500 रूपये उच्चांकी दर मिळाला.

हंगाम डिसेंबरपर्यंत 

मालवीतील हापूस आंब्याचा हंगाम ऑक्‍टोबर ते डिसेंबर अखेर चालतो. तसेच कोकणातील हापूस येण्यास अवधी असल्यामुळे तोपर्यंत सांगलीकरांना मालवीचा हापूस आंबा चाखता येईल. मात्र त्यासाठी जादा दर मोजावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hapus Mango In South Africa Arrives In Sangli