बेधडक ! हातकणंगले तहसिलने घेतली २१ वहाने ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

उत्खननात वापरात येणारी पोकलॅण्ड व राॅक ब्रेकर, भरणीसाठी वापरात येणारे जेसीबी मशिन व वाहतुकीसाठी डंपर अशी २४ वाहने ताब्यात घेतली. या कारवाईने शिये फाटा येथे खाण मालक, वाहन मालक, क्रशर मालक व खाण मजुरांनी मोठी गर्दी केली.

नागाव ( कोल्हापूर ) - शासकीय जागेत बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी कासारवाडी ( ता. हातकणंगले ) येथे धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये पोकलॅण्ड, राॅक ब्रेकर व जेसीबी अशी २१ वाहने ताब्यात घेतली. हातकणंगले तहसिलदार प्रदीप उबाळे व जिल्हा खणीकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी आज पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईने खाण मालक, वाहन मालक व क्रशर मालकांचे धाबे दणाणले आहेत. 

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी : कासारवाडी ( ता. हातकणंगले ) येथील शासकीय गट क्रमांक ६३० मधिल बेकायदेशीर उत्खननाबाबत हातकणंगले तहसिलदार यांच्याकडे अनेकांनी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. प्राप्त तक्रारीवरून तहसिलदार उबाळे यांनी खणीकर्म अधिकारी, एक पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक,  तीन मंडल निरीक्षक, दहा तलाठी व पोलिस कर्मचारी यांचे पथक घेऊन थेट घटनास्थळी धाड टाकली. यावेळी उत्खननात वापरात येणारी पोकलॅण्ड व राॅक ब्रेकर, भरणीसाठी वापरात येणारे जेसीबी मशिन व वाहतुकीसाठी डंपर अशी २४ वाहने ताब्यात घेतली. या कारवाईने शिये फाटा येथे खाण मालक, वाहन मालक, क्रशर मालक व खाण मजुरांनी मोठी गर्दी केली. तहसिलदार उबाळे यांनी सर्व वाहनांचा पंचनामा करून ही वाहने एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिली. 

पहाटे कारवाईमुळे कोट्यावधीची उलाढाल उघडकीस

कारवाई पहाटे आणि गोपनीय झाल्यामुळे सूर्योदयापूर्वी होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल निदर्शनास आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन शासनाकडे राॅयल्टीच्या स्वरुपात जमा होणारा महसुल खुपच कमी आहे. हे ही या कारवाईत स्पष्ट झाले. खाण मालक व खाण मजूर यांच्यातील अंतर्गत वादातून या तक्रारी झाल्या होत्या. आत्तापर्यंत कोणत्याही अधिकार्‍यांनी पहाटे घटनास्थळी येवून कारवाईचे धाडस दाखविले नव्हते. त्यामुळे खाण मालक आणि मजूरांच्यात कायद्याच्या विरोधात जाऊन उत्खनन करण्याचे धाडस निर्माण झाले होते. पहाटे उत्खनन करुन शासकीय कार्यालये सुरू होण्यापूर्वी खाणीकडे होणारी वाहतूक ठप्प व्हायची. त्यामुळे दिवसा कारवाई झालीच तर त्याला फारसे यश येत नव्हते.  

हेही वाचा - धक्कादायक ! अधिकारीच करतात गुन्हेगारांना मदत ? 

बेकायदेशीर उत्खनन थांबविण्याची लेखी मागणी

टोप येथील गंगारामनगर मधील वडर समाज गेली चाळीस वर्षे खाणीतील दगड फोडण्याचे काम करत आहेत. पण सद्या मोठमोठ्या ब्रेकर व पोकलॅण्ड तसेच बोअर ब्लास्टिंगच्या साह्याने वडर समाजाच्या मदतीशिवाय हे काम सुरू होते. त्यामुळे वडर समाजाने याबाबत एकत्रित येऊन बेकायदेशीर उत्खनन थांबविण्याची लेखी मागणी तहसिलदार प्रदीप उबाळे यांच्याकडे केली होती.  

हेही वाचा - कृष्णा नदीचे प्रदुषण नेमके कशामुळे ? 

उत्खननासाठी वापरलेली स्फोटकेही जप्त

घटनास्थळी झालेल्या कारवाई उत्खननासाठी वापरात येणारी स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली. दगड उत्खननासाठी भू सुरूंग व बोअर ब्लास्टिंगच्या माध्यमातून वापरात येणारी जिलेटीन आणि डिटोनेटर यांचा वापर केला जातो. याशिवाय उत्खनन शक्य नसल्याने या कारवाईत ही स्फोटके मिळणार काय?   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatkanagale Tahsil Action On Illegal Excavation