ते पंधरा दिवसांसाठीच आले होते... अन मिळाली "लंबी छुट्टी'

Ninety days of vacation: Happiness and waiting in a soldier's family
Ninety days of vacation: Happiness and waiting in a soldier's family
Updated on

सांगली ः ते पंधरा दिवसांसाठीच आले होते... यावेळची सुटी छोटी होती... परत जायची तारिखही ठरली होती... तोवर कोरोना आला, लॉकडाऊन झालं, रेल्वे बंद झाल्या आणि ते थांबले... एक-दोन दिवस नाही तर तब्बल तीन महिने त्यांना "लंबी छुट्टी' मिळाली. सैनिक कुटुंबासाठी हा काळ किती आनंदाचा ठरावा, याचे वर्णन करताच येणार नाही. दुसरीकडे अगदी तोंडावर आलेली सुटी लांबणीवर पडल्याने काहींची सीमेवर घालमेल सुरु आहे. सुटीवर आलेले लोक परतल्यावर त्यांची सुटी सुरु होईल. तोवर इकडे आनंद अन्‌ तिकडे प्रतिक्षा असाच माहोल असेल. 

एका राष्ट्रीय वर्तमानपत्राने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आता भारतीय सैन्याने सुटीवर अडकून पडलेल्या सैनिकांनी पुन्हा सेवेत रुजु व्हावे, यासाठी आदेश जारी केले आहेत. अशा दीर्घ सुटीवर सुमारे दोन लाखाहून अधिक सैनिक अडकले असल्याची माहिती आहे. त्याचवेळी नव्याने सुटीवर जावू इच्छिणाऱ्यांसाठीसुद्धा ही प्रक्रिया सुरु होईल. या दोन्ही पातळीवर "क्वारंटाईन'चा प्रस्ताव आहे. 

एकदा सैन्यात मुलगा भरती झाला की कुटुंबाला या विरहाची सवय होते. तो फार तर पंधरा दिवस, महिन्यासाठी आपल्यासोबत असणार हे आई जाणून असते. पती पहिला देशसेवासाठी आणि मग आपल्या कुटुंबासाठी, याची जाणीव ठेवूनच त्याच्या पत्नीने सप्तपदी घेतलेली असते. सीमेवरचा तणाव, गोळीबाराच्या बातम्या, बॉंबहल्ले हे नित्याचेच. या साऱ्यात सैनिक पतीला, मुलाला, बापाला अशी अचानक दीर्घ सुटी मिळाली आहे, असे याआधी बहुतेक कधीच घडलेले नाही. एव्हाना महिनाभर सुटीवर आलेल्या सैनिकाला युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुटी रद्द करून परत बोलावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी थोडं वेगळं घडलं.

सैनिकांना हवीहवीशी वाटणारी सुटी "कोरोना' संकटानं मिळाली. अर्थातच, या दीर्घ सुटीमुळे पुढचा वर्षभर परत गावी येता येईल की नाही, या रजा कशा गृहित धरल्या जाणार, याविषयी बऱ्याच शंका आहेत. 
दुसरीकडे सीमेवर तैनात सैनिकांची मोठी अडचण झाली आहे. उन्हाळ्याची सुटी ही त्यांच्यासाठी विशेष खासम्‌खास असते. या काळात मुलांच्या शाळांना सुटी असल्याने बहुतेकांचे सहलींचे नियोजन असते. लग्न समारंभासह अन्य सोहळ्यांचे नियोजन केले जाते. या साऱ्यावर यंदा पाणी पडलेले आहेच, मात्र सुटी तीन महिन्याहून अधिक काळ लांबल्याची सल त्यांच्या मनात नक्कीच आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com