आरोग्याची चौकशी करणाऱ्या परिचारिकेस चाबकाने मारहाण...येळवीत प्रकार; दोघा भावांवर गुन्हा 

बादल सर्जे 
Sunday, 26 July 2020

जत (सांगली) - आरोग्याबाबात माहिती व विचारपूस करण्यासाठी घरी आल्याच्या कारणावरून परिचारिकेला ग्रामपंचायतीसमोर चाबकाने मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील येळवी (ता. जत) येथे घडला. सुरेखा विलास विभुते (वय 55, रा. बंकेश्वर मंदिर मागे, जत) असे त्या आरोग्य सेविकेचे नाव आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी (ता. 24) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी धनाजी घोंगडे व बाळू घोंगडे (दोघे रा. येळवी, ता. जत) या दोघा भावांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, "आईचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवा, स्वॅब घेण्यासाठी घरी येणार असल्याने आमची बदनामी झाली' असा आरोप करीत या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत चाबकाने मारहाण केली. येळवी गावात सोनाबाई घोंगडे (वय 50) राहतात. त्या नुकत्याच परगावी जाऊन आल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांनी आरोग्य सेविका सुरेखा विभुते यांना त्यांचा स्वॅब घेण्यासाठी त्या कोठे राहतात, याची विचारपूस करून ठेवण्यास सांगितले. याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांनी गावातील एका व्यक्तीकडून पत्ता विचारून घेतला व त्या शुक्रवारी घोंगडे यांच्या घरी गेल्या. त्यावेळी सोनाबाई घरी नव्हत्या. त्यामुळे आरोग्य सेविका आरोग्य उपकेंद्रात गेल्या. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली.

दुपारी दोनच्या सुमारास दोघे संशयित तेथे आले. त्यांनी आरोग्य सेविका सुरेखा विभुते यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. "आमच्या आईचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवा, स्वॅब घेण्यासाठी घरी येणार असल्याने आमची बदनामी झाली', असे म्हणून दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करून चाबकाने मारहाण केली. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते. मारहाण केल्यानंतर दोघेही निघून गेले. त्यानंतर विभुते यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शनिवारी रात्रीपर्यंत दोघांपैकी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. 
 
संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health nurse beaten. Crime against two brothers