आरोग्यसेवक झाला कोरोनाबाधित;कुठे ते वाचा

बाळासाहेब गणे
Friday, 17 July 2020

दुधगाव (ता. मिरज, जि. सांगली ) येथील एका 40 वर्षीय आरोग्यसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.

तुंग : दुधगाव (ता. मिरज, जि. सांगली ) येथील एका 40 वर्षीय आरोग्यसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. मंगळवारी (ता. 14) त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. आज दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

सध्या ते कवठेपिरान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावळवाडी केंद्रात कार्यरत आहेत. काही कामानिमित्त ते कोल्हापूरला जाऊन आल्यावर त्यांना सर्दी व खोकला सुरू झाल्याने मंगळवारी त्यांचा स्वॅब घेतला होता. आज दुपारी पॉझिटिव्ह आल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. युवराज मगदूम यांनी सांगितले. कोरोनाबाधित आरोग्यसेवकाला तत्काळ मिरजेतील कोरोना रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच, त्यांच्या घरातील व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. 

दुधगावमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या गावाच्या परिसरात आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच, कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडी या गावातही आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. मिरज पश्‍चिम भागातील मौजे डिग्रजनंतर आता दुधगावमध्ये रुग्ण सापडल्याने आसपासच्या गावातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण दिसत आहे.

दुधगावमधील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांनी ग्रामपंचायत दुधगाव व आरोग्य विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत आठवडा बाजार बंद ठेवण्यात येईल, आसे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health worker corona infected in Dudhgaon