अहो आश्चर्यम ! विना शस्त्रक्रिया बदलली हृदयाची झडप 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

ट्रान्सकॅथेटर एरॉटीक व्हॅल रिप्लेसमेंट'ची वैशिष्ट्ये 

 • रुग्णाला भूल द्यावी लागत नाही. 
 • व्हेंटीलेटर लावावा लागत नाही. 
 • कापणे, टाके घालावे लागत नाही. 
 • चार दिवसांनी रुग्णाला घरी जातो. 
 • झडप पूर्ववत कार्यरत रोजची कामे करता येतात. 

कोल्हापूर - विना शस्त्रक्रिया हृदयाची झडप बदलण्याचा अभिनव यशस्वी प्रयोग येथील प्रतिथयश हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांनी केला. सुभाष पाटील (वय 65, शिरढोण, ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली) यांच्या हृदयाची निकामी झालेली मुख्य झडप विनाशस्त्रक्रिया बदलली. अत्यंत अवघड अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये हे उपचार केले याची माहिती डॉ. आडनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. आडनाईक म्हणाले, ""हृदयाच्या कप्प्यांत एओर्टिक, मायट्रल, ट्रायकस्पीड आणि पल्मनरी या चार झडपा असतात. यातील एओर्टिक झडप ही हृदयातील मुख्य झडप आहे. ती हृदयाचा मुख्य कप्पा आणि नस यांना जोडण्याचे काम करते. जंतूसंसर्ग, किंवा कॅल्शियम साठून या झडपेचे तोंड अरुंद होते. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. दम लागणे, छातीत दुखणे, धाप लागणे ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत. अशा प्रकारच्या आजारामध्ये लक्षणे दिसायला लागल्यापासून 5 वर्षांत रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. निकामी झालेली झडप बदलण्यासाठी अँजिओग्राफी किंवा ओपन हार्ट सर्जरी करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र आता विना शस्त्रक्रिया झडप बदलण्यासाठी "ट्रान्सकॅथेटर एरॉटीक व्हॅल रिप्लेसमेंट' ही पद्धत विकसित झाली आहे. श्री. पाटील यांच्यावर 24 ऑक्‍टोबर रोजी हे उपचार केले. 

रुग्ण सुभाष पाटील म्हणाले, ""ज्यावेळी मी स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये आलो. त्यावेळी पाच पावले चालले तरी दम लागत होता. या अत्याधुनिक पद्धतीने झडप बदलल्यामुळे मी जिना चढणे, गतीने चालणे व्यवस्थित करू शकतो. काही दिवसांनी शेतात कामही करेन.'' 

डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. दिलीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर कोंडेवार, डॉ. रेणू आडनाईक, डॉ. शरग आडनाईक, डॉ. रणजित सावंत, डॉ. राहुल माने, डॉ. सुरेश पाटील, डॉ. स्वप्नाली नरतवडेकर यांनी उपचार केले. 

अशी बसवतात झडप 

सुरुवातीला पायातील रक्तवाहिनीमधून कॅमेरा आत सोडून झडपेची स्थिती आणि आकार तपासला. त्याच रक्तवाहिनीमधून हृदयात पाईप टाकून निकामी झालेल्या झडपेच्या ठिकाणी कृत्रिम झडप बसवण्यात येते. 

अमेरिकेतून मागवली कृत्रिम झडप 

ही कृत्रिम झडप सिंथेटीक मटेरियल पासून बनवलेली असते. सजहपणे बसवता येते. झडपेचे माप अमेरिकास्थित कंपनीला ऑनलाईन दिल्यानंतर 24 तासात कृत्रिम झडप येते. सध्या ही झडप महाग आहे. मात्र शासनाने या उपचार पद्धतीचा समावेश शासकीय योजनेत केल्यास ती कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. असे डॉ. आडनाईक यांनी सांगितले. 

ट्रान्सकॅथेटर एरॉटीक व्हॅल रिप्लेसमेंट'ची वैशिष्ट्ये 

 • रुग्णाला भूल द्यावी लागत नाही. 
 • व्हेंटीलेटर लावावा लागत नाही. 
 • कापणे, टाके घालावे लागत नाही. 
 • चार दिवसांनी रुग्णाला घरी जातो. 
 • झडप पूर्ववत कार्यरत रोजची कामे करता येतात. 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heart Curtains Changed Without Surgery by Dr Adnaik In Kolhapur