
बेळगाव शहराला वादळी पावसाचा तडाखा
बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच क्लब रोड येथे दुचाकीवरून जाणाऱ्या विजय यल्लाप्पा कोल्हापूरे वय ६३ यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे कोल्हापूरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शहराच्या अनेक भागात झाडांच्या फांद्या व झाडे कोसळून ५० हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले असून तसेच वादळी वाऱ्याचा हेस्कॉमला मोठा फटका बसला असून वादळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पावसाने उसंत घेतल्यानंतर हेस्कॉमने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते तरीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास अधिक विलंब होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात पाऊस दररोज मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असून मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची शक्यता दिसून येत नव्हती. मात्र दुपारी साडे चारनंतर अचानकपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली सुरवातीपासूनच पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेकांनी तारांबळ उडाली त्यामुळे पावसापासून बचावासाठी अनेकांनी बस थांबे, पेट्रोल पंप, मंदिरे व जागा मिळेल त्या ठिकाणी थांबणे पसंत केले. त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी पहावयास मिळत होती. मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर काही जणांनी आपली वाहने जागा मिळेल त्या ठिकाणी लावली होती मात्र काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याने दुचाकी व चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
विजय कोल्हापूरे हे पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर काळी अमराई येथील आपल्या घराकडे निघाले होते मात्र त्याच वेळी त्यांच्या अंगावर वृक्ष कोसळून पडला त्यामुळे त्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे पाहताच त्यांना वाचण्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.
बापट गल्ली येथे दुचाकीवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वीज तारांवर फांद्या कोसळल्यामुळे शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे शहराच्या सर्वच भागात लहान मोठ्या फांद्या पडल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा रुग्णालय समोरील नागशंती शोरूम समोर लावण्यात आलेल्या वीसहून अधिक दुचाकींचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. याठिकाणी काही दुचाकी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लावण्यात आल्या होत्या तर काहींनी पावसाला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी दुचाकी लावून पाऊस लागणार नाही याची दक्षता घेतली. मात्र पावसाला सुरुवात झालेल्या काही वेळानंतर वाऱ्यामुळे या ठिकाणी मोठा वृक्ष उन्मळून पडला त्यामुळे काही वेळातच दुचाकींचा चक्काचूर झाल्याचे दुचाकी धारकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यापैकी अधिकतर दुचाकी काही महिन्यापूर्वीच घेण्यात आल्या होत्या अशी माहिती दुचाकीधारकांनी दिली आहे.
सांबरा रोडवर अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले तसेच झाडांच्या फांद्या पडल्याने या भागातील वाहतूक अनेक वेळ रोडावली होती. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून रस्त्यावर पडलेल्या फांद्या दूर करून वाहनाना जाण्याची सोय करून दिली.
जुने बेळगाव ते हलगा क्रॉसपर्यँत गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने या ठिकाणी पाच फुटापेक्षा अधिक पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. तसेच अनेकांची वाहने याठिकाणी अडकून पडली होती या भागातील गटारीचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे पावसानंतर याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहरासह वडगाव शहापूर भागातील पावसामुळे मोठे नुकसान झाले असून नाचते सरकले ते रिक्षावर फलक कोसळून रिक्षाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज तारांवर फांद्या कोसळल्याने वडगावच्या अनेक भागातील वीज पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.
Web Title: Heavy Rains Hit Belgaum City One Killed Injured Tree Fall
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..