सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; धरणांतून विसर्ग वाढवला

विष्णू मोहिते 
Saturday, 22 August 2020

जिल्ह्यात गेले दोन दिवस रिमझिम पाऊस सुरु आहे. कोयना आणि चांदोली परिसरात पुन्हा पाऊस वाढला आहे.

सांगली : जिल्ह्यात गेले दोन दिवस रिमझिम पाऊस सुरु आहे. कोयना आणि चांदोली परिसरात पुन्हा पाऊस वाढला आहे. त्यामुळे विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणातून 11 क्‍युसेकचा विसर्ग सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून 25 हजार आणि साडेसहा वाजल्यापासून 27 हजार 499 क्‍युसेक करण्यात आला आहे. चांदोलीतून 5 हजार 348 क्‍युसेक असणारा विसर्ग सायंकाळनंतर 11 हजार 978 क्‍युसेक असा वाढवण्यात आला. कोयनेतून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी किंचित वाढणार आहे. सांगलीतील आयर्विन पुलावर सायंकाळी सहा वाजता 24.8 फुट पाणी पातळी होती. 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 73 मिलिमिटर, नवजाला 138 आणि महाबळेश्‍वर येथे 105 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सकाळी आठ ते पाच या वेळेत कोयना परिसरात 50 मिलिमिटर, नवजाला 41 आणि महाबळेश्‍वरला 43 मिलिमिटर पाऊस पडला. गेल्या 24 तासात चांदोली परिसरात 65 तर सकाळी आठ ते पाच या काळात 20 मिलिमिटर पावसांची नोंद झाली. दोन्ही नद्यांच्या परिसरात पाऊस वाढल्याने विसर्ग वाढवला आहे. 

कृष्णा नदीवरील विविध पुलांच्या ठिकाणी पाण्याची आज सायंकाळी सहा वाजताची पाणी पातळी ः कृष्णा पूल कराड 18.6, बहे पुल-7.10, ताकारी-20.4, भिलवडी पूल-22.10, आयर्विन पूल सांगली 24.8, अंकली पूल-32.6 आणि राजापूर बंधारा-46.6 

शिराळा तालुक्‍यात 16.7 मि. मी. पावसाची नोंद 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.90 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 16.7 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आजअखेरचा पाऊस (मिलिमिटर) असा ः मिरज 2.4 (405.2), तासगाव 0.8 (360.4), कवठेमहांकाळ 0.6 (407.2), वाळवा-इस्लामपूर 4.2 (473.4), शिराळा 16.7 (1125.7), कडेगाव 2.4 (396.2), पलूस 3.0 (325.2), खानापूर-विटा 3.4 (470.4), आटपाडी 1.3 (288), जत 0.3 (233.1). 

चांदोलीत पावसाचा जोर 
वारणावती : चांदोली परिसरात दोन दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे धरणातून विसर्ग कमी करण्यात आला होता. मात्र पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून 7 हजार 291 क्‍युसेक्‍स पाण्याची आवक होत आहे. धरणक्षेत्रात 24 तासात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर आजपर्यंत 2257 मिलिमिटर एवढा पाऊस झाला. धरणाचा पाणीसाठा 32.06 टीएमसी झाला आहे. धरण 93.19 टक्के भरले आहे. धरणातून 1369 कयुसेक्‍स वीज निर्मिती व 10 हजार 609 सांडवा असा 11 हजार 978 पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains lashed Sangli district