कोरोनाविरोधात इथे उभा झाला मदतकार्याचा सेतू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात माणसाचे जगणेच अस्थीर झाले असताना त्यांना सावरण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती-संस्था देवदूत बनून मदतीला आल्या आहेत. शक्‍य त्या परीने त्यांचे मदतकार्य सुरु असून त्यातून मदतीचा मोठा सेतू  सांगलीत उभा राहिला आहे. 

सांगली ः सध्याच्या टाळेबंदीच्या काळात माणसाचे जगणेच अस्थीर झाले असताना त्यांना सावरण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती-संस्था देवदूत बनून मदतीला आल्या आहेत. शक्‍य त्या परीने त्यांचे मदतकार्य सुरु असून त्यातून मदतीचा मोठा सेतू उभा राहिला आहे.

इस्लामपूर येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत समाजाच्या सहकार्यातून गरजूंच्या जेवणाची सोय केली. त्यांच्या टीममधील एका महिला पोलिसाने प्रेरणा घेत पदरमोड करून दहा हजार रुपये या कामासाठी दिले. ते देताना त्या माऊलीने आपले नाव प्रसिध्द करु नये अशी अट वरीष्ठांना घातली. 

कुपवाड मार्गावरील लक्ष्मी देऊळ परिसरात दीपक कन्स्ट्रक्‍शन्स आणि अस्मिता ड्रायव्हिंग स्कुलच्या दीपक आणि सौ. अस्मिता सरडे यांनी मित्र परिवाराच्या सहाय्याने गेले दहा दिवस मजूर, कामगार रेशनकार्ड नसलेली कुटुंबे , दिव्यांग कुटुंबे, असहाय्य कुटुंबे, जेष्ठ नागरिकांसाठी मोफत धान्य, औषधे, इतर वस्तू घरपोहच देण्याचे काम सुरु ठेवले आहे. 

सांगलीतील प्रभाग आठचे नगरसेवक विष्णू माने यांनी अस्तित्व फाउंडेशनच्या माध्यमातून वारणाली, विजयनगर परिसरातील सव्वाचारशेंवर कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंची मदत पोहच केली आहे. या परिसरात मार्केटिंग कामाच्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आसपासच्या जिल्ह्यातील युवक येथे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यांची भिस्त खानावळीवर होती. मात्र त्या बंद पडल्याने आयुष संस्थेने पुढाकार घेत त्यांचा जेवणाचा प्रश्न मार्गी लावला. 

नॅशनल ऍन्टी क्राईम ह्युमन राईटस्‌ कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने परप्रांतीय कामगार, बहुरूपी, बेघर, फकिर, भिकारी यांना रोज 700 ते 800 जेवणाची पाकिटे दिली जात आहेत. दिलावर शिकलगार, समन्वयक मलिक भंडारी, सचिव अस्लम कोथळी यांची टीम याकामी व्यस्त आहे. 
गावभागातील शिदोरी नाष्टा सेन्टरच्या संचालक सौ. अपर्णा गोसावी रोज सुमारे तीस जणांचे जेवण बनवून देत आहेत. सांगलीत सर्किट हाऊसजवळ "स्वीट 60+' मॉर्नींग वॉक ग्रुपतर्फे 300 कुटुंबांना धान्याचे कीट वाटप केले आहे. 

ठाणेकर्स वेलनेस सेंटर तर्फे डॉ. किशोर ठाणेकर आणि त्यांच्या टीमने सध्या टाळेबंदीत आघाडीवर राहून काम करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणीची मोहिम सुरु केली आहे. अतिरिक्त तणावामुळे त्यांना रक्तदाब, साखर, अन्य त्रास होऊ नयेत यासाठी मोफत तपासणी सुरु ठेवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping bridge against Corona in Sangali