सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांकडून मदतीचा हात 

शिवकुमार पाटील 
Saturday, 19 September 2020

स्थानिक आरोग्य यंत्रणेला लागेल त्या मदतीची हमी देत 75 हजार रुपये किमतीच्या वस्तू त्यांनी दवाखान्यास भेट म्हणून दिल्या आहेत

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) : आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव असणे आणि प्रत्यक्ष गरजेच्या वेळी ही जाणीव जपणे यालाच खरे दातृत्व म्हटले जाते. आणि हे दातृत्व जपले आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे भवानीनगर (ता. वाळवा) येथील वंशज उद्योजक रघुनाथ मोहिते आणि संदीप मोहिते यांनी. 

कोरोना महामारीच्या काळात समाजाची गरज ओळखून त्यांनी सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची वाट न बघता एक पाऊल पुढे घेत स्थानिक आरोग्य यंत्रणेला लागेल त्या मदतीची हमी देत 75 हजार रुपये किमतीच्या वस्तू त्यांनी दवाखान्यास भेट म्हणून दिल्या आहेत. त्यांच्या या दातृत्वाची परिसरात चर्चा आहे. 

कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि आशा स्वयंसेविका प्रतिबंधात्मक सेवा देत आहेत. अशावेळी त्यांना वरिष्ठ यंत्रणेकडून मिळणारी मदत आणि प्रत्यक्ष स्थानिक गरज यांचा ताळमेळ घालणे अशक्‍य बनते. 

स्थानिक स्वराज्य संस्थाही अशावेळेस मागे पडत असल्या तरी सेवा देणाऱ्या यंत्रणा हतबल होतात. त्यांच्या सुरक्षेचा विचार करून एखादी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब पुढे येत असेल तर खरेच ही बाब कौतुकास्पद आहे. उद्योजक रघुनाथ मोहिते आणि संदीप मोहिते यांनी पुढाकार घेत ही जाणीव जपली आणि यंत्रणेला मोठी मदत केली आहे. 

त्यांनी ऑक्‍सिजन सिलिंडर, दवाखाना निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्प्रेयर, फॉगिंग मशीन व त्यासाठी लागणारे विविध केमिकल्स, ऑटो सॅनिटायझर मशीन, इन्फ्रारेड लॅम्प, पीपीई किट्‌स, थर्मल गन, ऑक्‍सिमीटर, सॅनिटायझर, मोठा स्टीमर, फेसशिल्ड अशा अनेक वस्तू आरोग्ययंत्रणेला पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौर यांच्याकडे या वस्तू सुपूर्द केल्या. याबाबत बोलताना उद्योजक रघुनाथ मोहिते म्हणाले, "गावाला सुरक्षा देणारा घटक सुरक्षित पाहिजे. मगच प्रत्येकजण सुरक्षित राहू शकतो.' 

यावेळी संदीप मोहिते, सरपंच राजेश कांबळे, रोहित मोहिते, शंकर कदम, धनंजय राजहंस, संपतराव मोहिते, दिगंबर कदम, उदयसिंह जांभळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गौर आणि दवाखान्यातील सर्व स्टाफ आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A helping hand from the descendants of Sarsenapati Hambirrao Mohite