"ती'च्या मदतीसाठी धावले "शिवबा'चे मावळे 

Her help from Rahuri youth
Her help from Rahuri youth

राहुरी : पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. रस्त्यावर सन्नाटा. किती तरी वेळ वाट पाहूनही आशेचा किरण दिसत नव्हता. तिचा धीर खचला. रस्त्याच्या कडेला एकटीच रडत बसली. हा प्रकार शिवबा प्रतिष्ठानाच्या मावळ्यांच्या लक्षात आला. त्यांनी आपुलकीने चौकशी केली. रक्ताच्या नात्यातील भावाला फोन केला; पण त्याने लक्षही दिले नाही. अखेर मावळ्यांनीच तिला पोटभर जेऊ घातले नि सुखरूप घरी नेऊन सोडले. 

घरी गेल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. "रक्ताच्या नातेवाइकांनी वाऱ्यावर सोडले. तुम्ही अनोळखी, परके. देवदूतासारखे मदतीला धावलात. तुमचे उपकार कसे फिटतील? परमेश्वर तुम्हाला सत्कर्माचे फळ देईल,' असा आशीर्वाद तिने शिवबा प्रतिष्ठानाच्या मावळ्यांना दिला. नगर-मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्‍टरी येथील श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात काल (गुरुवारी) दुपारी दीड वाजता हा प्रकार झाला. 
विमल शिवाजी गायकवाड-देशमुख (वय 55, रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) असे या महिलेचे नाव. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर संचारबंदी जाहीर झाली. त्यात त्या अडकल्या. सगळी हॉटेले बंद. दोन दिवसांपासून उपाशीपोटी होत्या. एसटी बंद असल्याने घरी कसे जायचे, असा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. 

शिवबा प्रतिष्ठानाच्या (राहुरी फॅक्‍टरी) कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिले. आपुलकीने चौकशी केली. धीर दिला. पोटभर जेऊ घातले, तेव्हा त्यांनी स्वतःची माहिती सांगितली. त्या मूकबधिर विद्यालयात शिक्षिका आहेत. पतीचे निधन झाले. कोट्यवधींची मालमत्ता असली, तरी त्यावरून सासऱ्यांशी वाद सुरू आहे. एक मुलगी असून, तिला मावशीकडे शिक्षणासाठी पाठविले आहे. सध्या त्या एकट्याच घरी राहतात. डोक्‍याला मार लागल्याने, श्रीरामपूर येथील मेंदूविकारतज्ज्ञांकडे उपचारासाठी आल्या होत्या. "संचारबंदीत त्यांना अडवू नये, त्या दवाखान्यात उपचारासाठी श्रीरामपूर येथे जात आहेत,' असे कोंढापुरी पोलिस ठाण्याचे पत्र त्यांच्याकडे होते. 

श्रीरामपूरहून राहुरी फॅक्‍टरीपर्यंत पायी 
एसटी बंद असल्याने, नगर-मनमाड रस्त्यावर पोचल्यावर एखादे तरी वाहन मिळेल, या आशेवर त्या श्रीरामपूरहून पायी राहुरी फॅक्‍टरीपर्यंत आल्या; परंतु एकही वाहन मिळत नव्हते. कुकाणे (ता. नेवासे) त्यांचे माहेर. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधला असता, 10 मिनिटांनी फोन करतो, असे त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर परत फोनच उचलला नाही. अखेर "शिवबा'चे मावळे भावासारखे मदतीला धावले. प्रतिष्ठानाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना काल (गुरुवारी) सायंकाळी सुखरूप घरी सोडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com