सांगलीत बेदाणा सौद्यात मिळाला इतका उच्चांकी दर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

दिवाळीच्या सुटीमध्ये बेदाणा सौदे बंद होते. सुटीनंतर मुहूर्तावर हळद व गुळाच्या सौद्यांना प्रारंभ झाला होता. त्यामुळे सांगलीतील सौद्यामध्ये बेदाण्याला किती दर मिळतो? याकडे शेतकरी, व्यापारी वर्गाचे लक्ष लागले होते.

सांगली - दिवाळीच्या सुटीनंतर आज बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला. या सौद्यात 215 रूपये प्रति किलो असा उच्चांकी भाव मिळाला. आजच्या सौद्या 50 गाड्यातून पाचशे टन बेदाणा आवक झाली होती. सरासरी दर 20 रुपयाने वाढला असल्याचे दिसून आले.

दिवाळीच्या सुटीमध्ये बेदाणा सौदे बंद होते. सुटीनंतर मुहूर्तावर हळद व गुळाच्या सौद्यांना प्रारंभ झाला होता. त्यामुळे सांगलीतील सौद्यामध्ये बेदाण्याला किती दर मिळतो? याकडे शेतकरी, व्यापारी वर्गाचे लक्ष लागले होते. आजच्या बेदाणा सौद्यात तब्बल पाचशे टनाची आवक झाली होती. दुपारी एक वाजता सौद्यांना प्रारंभ झाला. त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत सौदे चालू होते.

नुकसानीमुळे दरवाढ 

दिवाळीपूर्वी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. द्राक्ष बागायत क्षेत्रात "फ्लावरिंग' व "पोंगा' स्तरावर अनेक बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाणा दरवाढ होणार हे निश्‍चितच होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आजच्या सौद्यात खरेदीसाठी गर्दी केली होती. प्रशांत मजलेकर यांच्या दुकानातील श्री पद्मन या शेतकऱ्यांच्या 50 बॉक्‍सच्या बेदाण्याला प्रतिकिलो 215 रूपये इतका उच्चांकी भाव मिळाला. नंदी कृष्णा ट्रेडर्सचे अमित पटेल यांनी तो खरेदी केला.

बेदाण्याचे प्रतिनुसार दर असे

चांगल्या प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास 160 ते 210 रूपये तर मध्यम प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास 120 ते 160 रुपये प्रति किलो भाव मिळाला. काळा बेदाण्याचा दर वाढला असून 70 ते 100 रुपये प्रति किलो दर मिळाला. पहिल्याच बेदाणा सौद्यात सरासरी 20 ते 25 रुपये प्रति किलो दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सौद्यासाठी व्यापारी मनोज मालू, नितीन अटल, नितीन मर्दा, पणु सारडा, अस्की सावकार, गगन अग्रवाल, रुपेश पारेख, विनायक
हिंगमिरे, मुकेश केसरी, वृषभ शेडबाळे, विनोद कबाडे, जितू शेटे, हिरेन पटेल, अजित मगदूम, तुषार शहा, निलेश मालू आदीसह शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, के.एन. दरुरे, प्रशांत कदम हे सौद्याचे संयोजन करत आहेत.

चांगला दर मिळण्याची आशा

""अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला बेदाणा कमी प्रमाणात येईल. त्यामुळे चांगला दर यापुढे मिळेल असे वाटते.''
दिनकर पाटील, सभापती, बाजार समिती सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highest Rate Received In Sangli Bedana Deal