सुशांतला त्यांची अनोखी श्रध्दांजली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का सर्वांनाच बसला. अनेकजण हळहळले. व्यथित झाले. काहींनी समाजमाध्यमांवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.  प्रयोगशिल शेतकरी आणि अभियंता असलेल्या मिलिंद थोरात यांनी मात्र या प्रकारांची मुलभूत कारणमिमांसा करताना ...

इस्लामपूर (सांगली) : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का सर्वांनाच बसला. अनेकजण हळहळले. व्यथित झाले. काहींनी समाजमाध्यमांवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. येथील प्रयोगशिल शेतकरी आणि अभियंता असलेल्या मिलिंद थोरात .यांनी मात्र या प्रकारांची मुलभूत कारणमिमांसा करताना पुस्तकांशी..पुस्तकवेड्या मित्रांशी गट्टी करा असे आवाहन केले आहे. त्यासाठी कृतीशील पाऊल म्हणून फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी स्वतःचे खासगी ग्रंथालय सर्वांसाठी मोफत खुले केले आहे.

 

जीवाभावाच्या लोकांचा सहवास आणि संवादातून एकटेपणावर मात करता येईल. त्याबरोबर तर्कसंगत विचारांची बैठक घडवणेही गरजेचे असेल. त्यासाठी चांगल्या ग्रंथाचे वाचन हवे. वाचनवेड जपले पाहिजे. एखाद्या "स्टार'चे जाणे समाजाला अनेकांगाने अस्वस्थ करते. दिर्घकाळ त्यांची कंपने समाजमनावर उमटतात. प्रयोगशिल शेतकरी असलेल्या मिलिंद थोरात यांनी सुशांतचं असं जाणं कशामुळे झाले याचा खोलवर विचार केला.आपल्या आजुबाजूच्या तरुणाईला अशा घटनांपासून परावृत्त करतानाच प्रतिबंधात्मक पाऊले त्या दिशेने उचलली पाहिजेत हे ओळखून त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली. ते म्हणतात, सुशांतचं जाणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं. यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयुष्यात असलेली मित्रांची गरज. आपले सुखदुःखाचे क्षण कोणाजवळ तरी मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजेत. त्यासाठी असे मित्र सोबत हवेत. आई, वडील, बायको,बहिण, भाऊ ते असतील तर कधी सुर जुळलेले रक्ताच्या नात्याबाहेरील मित्र-मैत्रिणी असतील. तर असं दुर्दैवी पाऊल शक्‍यतो कोणी उचलणार नाही. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या मित्रांसोबत चांगल्या पुस्तकांचे सान्निध्य हवे. पुस्तके जगणं समृद्ध बनवतात. विवेकी बनवितात. सारासार विचारांची कुवत निर्माण होते. म्हणून मी एक निर्णय घेतलाय. माझ्याकडील संग्रही खुप सारी पुस्तके आहेत. सुशांतला श्रद्धांजली म्हणून मी आज माझ्याकडील सर्व पुस्तके ज्या कोणाला वाचायची असतील त्यांच्यासाठी यापुढे सताड खुली असतील. तुम्ही ती आपल्या घरी नेऊ शकता. वाचून झाले की पहिले पुस्तक देऊन दुसरे नेऊ शकता.''
मिलिंद यांच्या आवाहनाला अनेकांनी शुभेच्छा देत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
चांगल्या वाचनाने आयुष्य बदलते. माझ्याकडील पुस्तके शोभिवंत वस्तू बनू नयेत. ती लोकांच्या उपयोगी पडावीत अशी माझी भावना असल्याची भावना मिलिंद यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: His unique tribute to Sushant