सांगलीत महिलांनी 'या' कारणासाठी पुरुषांना दिले काठीने फटके...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

महिला मंडळ पुरुषांना काठीने पिटाळताना तुम्ही कधी पाहिले आहे का..? पण मिरजमध्ये स्त्रिया होळीच्या सणावेळी पुरुषांना काठीने बदडून काढतात.

सांगली -  सर्व महिला मंडळ पुरुषांना काठीने पिटाळताना तुम्ही कधी पाहिले आहे का..? पण मिरजमध्ये स्त्रिया होळीच्या सणावेळी पुरुषांना काठीने बदडून काढतात. होळीच्या निमिताने गोसावी समाजात झेंड्याचा खेळ खेळला जातो. या खेळा दरम्यान महिला पुरुषांना काठीने मारतात. अनेक वर्षांपासून ही अनोखी प्रथा गोसावी समाजात चालू आहे.

या समाजात होळीनंतर तिसऱ्या दिवशी हा आगळा वेगळा झेंड्याचा खेळ-खेळला जातो. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याच ठिकाणी गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो आणि तो झेंडा पकडून सर्व महिला उभ्या असतात. तर पुरुषांकडून तो झेंडा पळवुन नेण्याचा प्रयत्न केला जातो. तर सर्व महिला, पुरूषांना झेंडा पळवून नेण्यापासून रोखतात. यावेळी पुरुष मंडळीना पिटाळून लावण्यासाठी महिला पुरुषांना काठीने बदडून काढतात.

वाचा - व्हॉट्‌सॲपवरील त्या मेसेजमुळे मोडले तिचे लग्न...

या खेळादरम्यान अनेक पुरुषांनी महिलांच्या ताब्यातील झेंडा पळवण्याचा प्रयत्न केला. यारम्यान महिलांन कडून पुरुषांना चांगलेच फटके बसले. मार खाल्ला खरा पण या खेळामध्ये यावर्षी पुरुषांनी महिलांच्या हातातील झेंडा पळवत हा खेळ जिंकला.

महाराष्ट्रातील गोसावी समाज मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतो. या समाजा कडून हिंदू सण समारंभ मोठ्या श्रद्धेने साजरे होतात. होळीच्या दिवशी पुरुष मंडळीना काठीने मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्षे चालत आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: holi celebration of Gosavi community in miraj