esakal | सातारा : चार मंत्रिपदे; चौफेर विकासाची अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा : चार मंत्रिपदे; चौफेर विकासाची अपेक्षा

गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या काळात सातारा जिल्ह्यात एकही मंत्रिपद नव्हते. त्यामुळे या काळात मागे पडलेल्या जिल्ह्याच्या विकासाला आता चार मंत्र्यांच्या माध्यमातून चालना मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्याने जिल्ह्यातील जनतेत आनंद व समाधानाचे वातावरण आहे.

सातारा : चार मंत्रिपदे; चौफेर विकासाची अपेक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व मूळच्या कोंडवे (ता. सातारा) आणि मुंबईमधून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड व मूळचे दरेतांब 
(ता. महाबळेश्‍वर) आणि ठाण्यातून शिवसेनेतून निवडून आलेल्या एकनाथ शिंदेंना मंत्रिपद दिले गेले आहे.

जरुर वाचा - उदयनराजेंना चीतपट करणारे बाऴासाहेब झाले मंत्री 

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा प्रत्येक पक्षातील प्रमुख दोन नेत्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला. यामध्ये महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दरेतांब येथील एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. श्री. शिंदे हे मुंबईत स्थायिक असले तरी त्यांचा दरेतांबला कायम संपर्क असून, त्यांनी या परिसराच्या विकासात योगदान दिले आहे.
त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर आज झालेल्या मंत्रिपदाच्या विस्तारात सातारा जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत.

लोकनेत्यांच्या नातवाची बोळवण

यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रिपद तसेच जलसंपदा मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर 2014 मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आले, त्यावेळी पाच वर्षे मात्र, जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नव्हते. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना अखेरच्या टप्प्यात मंत्रिपद मिळेल, अशी केवळ चर्चाच झाली होती.

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आता सत्तेत आले आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे जिल्ह्याला शिवसेनेकडून मंत्रिपद मिळणार हे निश्‍चित झाले होते. त्यानुसार पाटणचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रिपद दिले आहे. बाळासाहेब देसाई यांच्यानंतर विक्रमसिंह पाटणकर हे मंत्री झाले. या दोघांनंतर शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. मात्र, त्यांना राज्यमंत्रिपद दिले आहे.

लोकनेत्यांच्या नातवाला केवळ राज्यमंत्रिपद देऊन बोळवण केल्याचीही भावना त्यांच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाली असून, एकीकडे मंत्रिपद मिळाल्याचा आनंद असला तरी राज्यमंत्रिपदाबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. शंभूराज देसाई यांनी उत्कृष्ट संसदपट्टू, विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून पाच वेळा काम पाहिले आहे. तसेच युतीच्या काळात सहकार परिषदेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र बॅंकेचे संचालकपदीही त्यांनी काम पाहिले आहे. 

हेही वाचा - शिवसेनेचे धडाकेबाज शंभूराज आता राज्यमंत्री

अष्टेकरांनंतर 30 वर्षांनी...
 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. माजी मंत्री शामराव अष्टेकर यांच्यानंतर सुमारे 30 वर्षांनी कऱ्हाड उत्तरला बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. पाच वेळा आमदार आणि खासदार श्रीनिवास पाटील यांना उदयनराजेंच्या विरोधात सर्वाधिक 50 हजारांचे मताधिक्‍य कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून त्यांनी मिळवून दिले होते. त्यामुळे उदयनराजेंचा पराभव करण्यात बाळासाहेब पाटील यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना मंत्रिपद दिले गेल्याचे सांगितले जात आहे.

बाळासाहेब पाटील यांची राजकीय, सामाजिक कारकिर्द

बाळासाहेब पाटील हे सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक, तसेच आजअखेर ते कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राज्यातील सहकारात त्यांनी "सह्याद्री पॅटर्न' निर्माण केला आहे. सलग पाचव्यांदा ते या मतदारसंघातून निवडून आलेले असून, पहिल्यापासून राष्ट्रवादीच्या पाठीशी ते ठामपणे राहिले आहेत. हे सर्व गुण जाणून घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीत मंत्रिपद देऊन आमदार पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा गौरव केल्याची कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्र विधानसभा अंदाज समिती प्रमुख तसेच विधानमंडळातील नगरविकास विभाग व गृहनिर्माण विभागाशी संलग्न स्थायी समितीवरही त्यांनी काम केले आहे. साखर कारखानदारीतील त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली होती. त्याशिवाय त्यांनी सलग दोनदा राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदही भूषविले आहे.

आमदार वर्षा गायकवाड पुन्हा मंत्री

कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड या धारावी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्या तरी त्यांचे मूळगाव कोंडवे (ता. सातारा) हे आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळातही मंत्रिपदी यशस्वीपणे काम केले आहे. त्यांची आता पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने सातारा जिल्ह्याला त्यांच्या रूपाने चौथे मंत्रिपद मिळाले आहे.

loading image