उदयनराजेंना चीतपट करणारे बाऴासाहेब झाले मंत्री

सातारा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

आज (साेमवार) महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पाटील हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कट्टर असून नुकत्याच झालेल्या सातारा लाेकसभा पाेटनिवडणुकीत माजी खासदार उदयनराजे भाेसले यांचा पराभव करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मानले जाते.

सातारा ः सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील हे सन 1992 पासून समाजकारण आणि राजकारणात सक्रीय झाले. ते सन 1992 मध्येच सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक म्हणून कामकाज पाहत होते. त्यानंतर सन 1996 कालावधीत सह्याद्री साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आली. आजअखेर ते कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील सहकारात सह्याद्री पॅटर्नच निर्माण झाला आहे.

हेही वाचा - साताऱ्यातील दोन्ही आमदार म्हणतात, आम्ही शरद पवारांसोबत

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते सन 1999 मध्ये निवडणूक लढवून पहिल्यांदा निवडून आले. त्यांतर सन 2014 पर्यंत सलग पाचव्यांदा ते कऱ्हाड उत्तरचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. या दरम्यान सन 2009 वगळता उर्वरीत चारही वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ते निवडणूकीस सामोरे जावून निवडून आले. 
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत बाळासाहेबांनी तब्बल ४८ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. याबराेबरच खासदार श्रीनिवास पाटील यांनाही सातारा लोकसभा पाेटनिवडणूकीत कऱ्हाड उत्तरमधून ५० हजार मतांची आघाडी मिळवून दिली. माजी खासदार उदयनराजे भाेसले यांच्या पराभवात बाळासाहेबांचा माेलाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले हाेते.

दरम्यान सन 2009 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला हाेता. त्यावेळी ही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी ठामपणे राहिले.

नाेव्हेंबरला ठरले - या आमदाराला मंत्रीपद देण्याचे पवारांचे संकेत

महाराष्ट्र विधानसभा अंदाज समिती प्रमुख तसेच विधानमंडळातील नगरविकास विभाग व गृहनिर्माण विभागाशी संलग्न स्थायी समितीवरही त्यांनी काम केले आहे. साखर कारखानदारीतील त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याशिवाय सलग दोनदा राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या अध्यक्षपदाची तसेच उपाध्यक्षपदाची जबाबादारी सोपवली होती.

जेष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीत मंत्रीपद देवून आमदार पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा गौरव केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Patil Sworn As Cabinet Minister In Maharashtra Government