"कोविड एक्‍स्प्रेस' कधी येणार? रुग्णालये हाउसफुल्ल; तरी अजूनही मागणी नाही 

शंकर भोसले
Friday, 11 September 2020

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कोविड एक्‍स्प्रेस तयार करण्यात आली आहे; पण मागणीअभावी ती पुणे स्थानकात थांबून आहे. 

मिरज : जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या मिरज शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने वाढली असून, या दोन महिन्यांत तब्बल दोन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मिरजेतील जिल्ह्याचे कोविड रुग्णालय हाउसफुल्ल आहे. खासगी रुग्णालयांतही हीच अवस्था आहे. या रुग्णांवर उपचारासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कोविड एक्‍स्प्रेस तयार करण्यात आली आहे; पण मागणीअभावी ती पुणे स्थानकात थांबून आहे. 

सध्या पुणे विभागामध्ये रुग्णसेवा देण्यासाठी एप्रिल महिन्यात 60 कोचची ही रेल्वे सुसज्ज झाली आहे. एका बोगीमध्ये नऊ वॉर्ड असून, यामध्ये एकाच वेळी सोळा रुग्णांवर वैद्यकीय उपचार होऊ शकतात. प्रत्येक बोगीमध्ये डॉक्‍टर, नर्स, वॉर्ड बॉयसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहेत. चोवीस तास पाणी, लाईट, स्वच्छता यासह सोयीसुविधांनी कोविड एक्‍स्प्रेस युक्त आहे. रेल्वे प्रशासनाकडून कोविड एक्‍स्प्रेसमध्ये पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. सध्या पुणे विभागामघ्ये 60 बोगी सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत; मात्र अद्यापही राज्य सरकारकडून कोणतीच मागणी करण्यात आली नाही. 

सध्या मिरजेत शासकीय एक आणि खासगी चार कोविड रुग्णालये आहेत. यामधील सध्याची रुग्णसंख्या पाहता सर्वच रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. रुग्णांना बेड, ऑक्‍सिजन मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाय आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड एक्‍स्प्रेस सोयीची ठरू शकते. मिरज स्थानाकात एकूण सहा प्लॅटफॉर्म कार्यान्वित आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि तीन येथे सध्या सुरू असलेल्या गाड्या थांबवल्या जातात. इतर रिकाम्या प्लॅटफॉर्मवर एक्‍स्प्रेस थांबवण्याची सोय होऊ शकते. 

मागणी केल्यास कोविड एक्‍स्प्रेस देण्यात येईल
रेल्वेकडून या जागतिक आपत्तीमध्ये राज्य सरकारला मदत करण्यासाठी एप्रिल महिन्यामध्येच रेल्वेच्या पुणे विभागात एकूण 60 बोगींची कोविड एक्‍स्प्रेस तयार आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता कोविड एक्‍स्प्रेसची मागणी करण्यात आली नाही. मागणी केल्यास संख्येनुसार कोविड एक्‍स्प्रेस देण्यात येईल. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospitals are full, but there is still no demand for Covid Express in Miraj