
नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आरोग्य विभागात आरोग्यसेविका नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अहोरात्र रुग्णसेवा करीत आहेत. जनतेचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याच आरोग्यसेविकांवर स्वतःच्याच घरात परके होण्याची वेळ ओढवली आहे. खबरदारी म्हणून त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घातलेली बंधने पाळताना होणारा मनाचा कोंडमारा मात्र त्यांना मुकाट सहन करावा लागत आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, उपरुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांच्यासह खासगी रुग्णालये प्रयत्न करीत आहेत. यामध्ये डॉक्टर, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माता, कंपाउंडर आदींचा समावेश आहे. या सर्वांनी "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' हे व्रत प्रत्यक्षात अंगीकारले आहे. ही रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्यसेविकांना मात्र अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना आपल्या मुलांना भेटण्याचीही खोटी झाली आहे. स्वयंपाकघरापासूनही दूर राहण्याची वेळ आली आहे.
मुलांनी कितीही हट्ट केला, तरी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खायला करून देणे शक्य होत नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून काही आरोग्यसेविकांनी माहेरच्या, तर काहींनी सासरच्या मंडळींना घरी बोलावून मुलाबाळांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. या ज्येष्ठ मंडळींनीही आता आरोग्यसेविकांसाठी घरात नियमावली केली आहे.
स्वयंपाकगृहापासून, तसेच मुले व वृद्धांपासून त्यांना दूर ठेवण्यास सुरवात केली आहे. सॅनिटाइझ होऊन व अंघोळ करूनच त्यांना घरात प्रवेश दिला जात आहे. "खबरदारी म्हणून आमच्याच घरात आम्हाला परक्यासारखे वागावे लागत आहे. हे सर्व आमच्या व कुटुंबीयांच्या आरोग्यासाठीच आहे. ते आहेत म्हणूनच आमची मुले व घरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत,' अशी प्रतिक्रिया काही आरोग्यसेविकांनी दिली.
सॅनिटाइझ झाल्याशिवाय बाळाला घेता येईना
आई दिसली, की लहान बाळ लगेच तिच्याकडे झेपावते. बाळ झेपावत असल्याचे लक्षात येताच ती त्याच्याकडे धावत जाते. आरोग्य विभागात कार्यरत महिलांना मात्र कर्तव्यावरून घरी गेल्यानंतर बाळ त्यांच्याकडे कितीही झेपावले, रडले तरी स्वतः सॅनिटाइझ झाल्याशिवाय त्याला घेता येत नाही, तेव्हा मात्र दुःख होते. पण हे दुःख गिळावेच लागते. कामरगाव उपकेंद्रात कार्यरत आरोग्यसेविका वर्षा भापकर तर गरोदर असूनही, घरच्यांचा विरोध पत्करून, रजा न घेता आरोग्यसेवा करीत आहेत.
आम्ही लढतोय; पण तुम्ही घरीच बसा!
कर्तव्यावर जाताना विनाकामाचे फिरणारे दिसल्यानंतर राग येतो. कोरोनाविरोधात आम्ही लढत असताना हे लोक विनाकारण का फिरतात? ते घरात बसले तरच कोरोनावर विजय मिळविणे शक्य आहे. आम्ही आमची लहान मुले घरी ठेवून त्यांच्यापासून दुरावलो आहोत. आम्ही लढतोय हो... फक्त तुम्ही घरात बसा, अशी अपेक्षा काही आरोग्यसेविकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.