esakal | हुबळी, बेळगाव पॅसेंजर मिरजऐवजी शेडबाळपर्यंत; रेल्वे कर्नाटकात अडवल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Hubli, Belgaum Passenger upto Shedbal instead of Miraj; Railways blocked in Karnataka

कर्नाटक रेल्वेच्या दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने मिरजपर्यंत धावणाऱ्या तीन गाड्यांना शेडबाळ रेल्वे स्थानकापर्यंतच धावण्याची परवानगी दिली आहे.

हुबळी, बेळगाव पॅसेंजर मिरजऐवजी शेडबाळपर्यंत; रेल्वे कर्नाटकात अडवल्या

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज (जि. सांगली) : कोरोना संसर्ग वर्षपूर्तीनंतर 12 एप्रिल पासून कर्नाटकात टप्प्या-टप्प्याने पॅसेंजर गाड्या सुरू होत आहेत. मात्र कर्नाटक रेल्वेच्या दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने मिरजपर्यंत धावणाऱ्या तीन गाड्यांना शेडबाळ रेल्वे स्थानकापर्यंतच धावण्याची परवानगी दिली आहे. वास्तविक या तीन गाड्यांचा पूर्वीचा मार्ग हुबळी-बेळगाव-मिरज असा आहे. 


मात्र महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना संसर्गाचा विचार करून हुबळी विभागाकडून हुबळी-शेडबाळ, बेळगाव-शेडबाळ आणि शेडबाळ-बेळगाव या तीन पॅसेंजर गाड्या नियमितपणे कर्नाटकातील शेडबाळपर्यंत सोडण्याची तयारी केली आहे. एरवी मिरजेपर्यंत धावणाऱ्या गाड्यांना शेडबाळ स्थानकापर्यंत धावण्याची परवानगी कर्नाटकने दिल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांवर अन्याय होत असल्याची भावना रेल्वे संघटनांनी व्यक्त केली आहे. 


दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून महाराष्ट्राला डावलून आणि महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग वाढीचे कारण देत कर्नाटक राज्यांतर्गत पॅसेंजर गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. वास्तविक हुबळी विभागाचे शेवटचे रेल्वे स्थानक आणि शेवटची सीमा महाराष्ट्रातील म्हैसाळ नजीक विजयनगर आहे. मात्र कर्नाटकच्या दुटप्पी भूमिकेमुळे या गाड्यांना महाराष्ट्रात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

कोरोना संसर्गामुळे निर्णय घेतला गेल्याची शक्‍यता

कर्नाटकातील दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने हा निर्णय घेतला आहे. मिरज स्थानकापर्यंत गाड्या सोडण्याची हुबळी विभागाचे पुणे विभागाकडे कोणतेही पत्र किंवा मागणी नाही. पूर्वी या गाड्या मिरज स्थानकापर्यंत धावत होत्या. मात्र कोरोना संसर्गामुळे निर्णय घेतला गेल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग 

विजयनगर स्थानकापर्यंत पॅसेंजर सोडणे अपेक्षित
विजयनगर कर्नाटकातील हुबळी स्थानकाच्या हद्दीत समाविष्ट आहे. हुबळी प्रशासनाकडून रेल्वे आपल्याच हद्दीत सोडण्याचे नियोजन असेल, तर महाराष्ट्रातील विजयनगर स्थानकापर्यंत हुबळी, बेळगाव पॅसेंजर सोडणे अपेक्षित होते. पण कर्नाटक महाराष्ट्रातील प्रवासी स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे शेडबाळ स्थानकापर्यंत पॅसेंजर सोडण्याचे नियोजन केले आहे. 
- किशोर भोरावत, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना, मिरज 

मिरजेतूनही पॅसेंजर सुरू करा
कर्नाटकप्रमाणे कोल्हापूर, पंढरपूर, परळी, सोलापूर, सातार पॅसेंजर गाड्या पुणे विभागाने सुरू कराव्यात. कर्नाटक सरकार पॅसेंजर गाड्या सुरू करते. तसेच पुणे-फलटण, पुणै-दौंड आणि मुंबई येथोल लोकल प्रमाणे मिरजेतूनही पॅसेंजर सुरू कराव्यात. 
- मोहन वाटवे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती, पुणे विभाग

संपादन : युवराज यादव