
अहवाल देण्याचे रस्ता सुरक्षा कमिटीचे सरकारला आदेश
बेळगाव : हुबळी-धारवाड बायपास रोडवर धारवाडपासून आठ किलोमीटर अंतरावरील इटगट्टीनजीक १५ जानेवारीला झालेल्या अपघातात १३ जण ठार झाले होते. याची दखल सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा कमिटीने घेतली. या अपघाताचा अहवाल राज्य सरकारकडे मागितला आहे.
वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरघाव टिप्परने समोरून येणाऱ्या मिनी बसला धडक दिली होती. मृतांमध्ये दावणगेरीतील अकरा महिला व मिनी बसचालक व वाहकाचा समावेश आहे. गोव्याला जात असताना हा अपघात घडला. कमिटीने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. यासंबंधी रस्ता सुरक्षतेबाबत अहवाल मागितला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा कमिटीचे समन्वयक सचिव सर्वजीत सिंग अहुवालीया यांनी राज्य सरकारच्या परिवहन विभागाचे मुख्य सचिव अंजुम परवेज यांना पत्र पाठविले आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल देण्याची सूचनाही केली आहे. १५ जानेवारीला घडलेल्या अपघाताचा सविस्तर अहवाल तसेच यापुढे असे अपघात घडणार नाहीत. याबाबत राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. याची माहिती मागितली आहे.
राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचनाही केली आहे. तसेच गेल्या दोन वर्षात हुबळी आणि धारवाड या बायसपासवरील ३२ किलोमीटर अंतरावर किती अपघात झाले आहेत. याची माहिती मागितली आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल द्यावा, अशी सूचनाही आदेशाद्वारे केली आहे. या कमिटीचे चेअरमन न्यायमूर्ती अभय सप्रे, सदस्य संजय मित्रा व डॉ. निशी मित्तल आहेत.
संपादन- अर्चना बनगे