कोल्हापूर : महापुरात शंभरावर सापांना जीवदान

संदीप खांडेकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - महापुरात अडकलेल्या माणसांना वाचविण्यासाठी माणूस धावला, जीवनावश्‍यक वस्तू पूरग्रस्तांना देण्यासाठी हजारो हात सरसावले. त्यांना आसरा देण्यासाठी अनेक संस्थाही पुढे आल्या, मात्र पुरात जीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या प्राणी व पक्ष्यांना वाचविण्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन ॲन्ड रिसर्च सोसायटीचे सदस्य धावले. एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल शंभराहून अधिक विषारी व बिनविषारी जातींचे साप व पक्ष्यांचे जीव त्यांनी वाचवले. विशेष म्हणजे त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून त्यांच्याविषयी तळमळ दाखविली.

पाणी बिळात शिरल्यानंतर विविध सापांना जीव वाचविण्यासाठी आसपासच्या घरांत अथवा घरांच्या छतावर आसरा घ्यावा लागला. पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने झाडेही बुडाली होती. घरात सापडल्यानंतर पूरग्रस्तांची झोप उडाली. या सापांना कोणी ठार मारू नये, याची चिंता वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन ॲन्ड रिसर्च सोसायटीच्या सदस्यांना सतावत होती. त्यामुळे ठिकठिकाणी जाऊन सापांना व पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम सुरू केली. प्रयाग चिखली, आंबेवाडी, लक्षतीर्थ, चंबुखडी, सुतार मळा, शिंगणापूर, जिव्हाळा कॉलनी, हणमंतवाडी, बोंद्रेनगर, नागाळा पार्क, रमणमळा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा परिसरातून त्यांना साप घरात अथवा परिसरात आल्याची माहिती लोक देत होते, क्षणाची उसंत न दवडता ते त्या ठिकाणी पोचत होते. घोणस, नाग, मण्यार, वेरोळा, नानेटी, तस्कर, धामण, कवड्या, खापर खवल्या, बॅन्डेड कुकरी अशा विषारी बिनविषारी सापांना त्यांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे कामही केले. त्यांच्या या मोहिमेत स्मिता बागल व अश्‍विनी जाधव-कसबेकर सहभागी झाल्या होत्या. स्पून बिल, कोकिळा, वटवाघूळ, ग्रे हेरॉन या जखमी पक्ष्यांवरसुद्धा त्यांनी उपचार करून सोडून दिले. 

नेतृत्व देवेंद्र भोसले यांनी केले. शोएब बोबडे, फिरोज झारी, आशुतोष सूर्यवंशी, रोहित शिर्के, अक्षय कांबळे, किशोर काकडे, ओमकार खाबडे, अवधूत पाटील, राहुल मंडलिक, प्रमोद पाटील, मयूर लवटे, सौरभ कोकाटे, शिवा देवाडकर, स्मिता बागल, अश्‍विनी जाधव-कसबेकर, सागर पाटील, आदित्य ऐनापुरे, राम यादव, सुनील पन्हाळकर या त्यांच्या सहकाऱ्यांनी सापांना जीवदान देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

२० तरुणांची फौज
वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन ॲन्ड रिसर्च सोसायटी ही सातारा येथील संस्था आहे. डॉ. अमित सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे काम सुरू आहे. तिच्याशी सुमारे वीस तरुण जोडले आहेत. 

पुराचे पाणी आता उतरले आहे. विविध प्रकारचे साप लोकांना दिसतील. अशा वेळी त्यांनी त्यांना न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. 
- देवेंद्र भोसले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundreds of snakes saved in Kolhapur Floods