
कोरोना, अतिवृष्टीमुळे अगोदरच पिचलेले भाजीपाला, द्राक्ष बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा बंगालच्या खाडीतून आलेल्या 'निवार' चक्रीवादळाचा फटका बसला आहे.
लेंगरे : कोरोना, अतिवृष्टीमुळे अगोदरच पिचलेले भाजीपाला, द्राक्ष बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा बंगालच्या खाडीतून आलेल्या 'निवार' चक्रीवादळाचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, द्राक्ष बागेवर रोगराईचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील सुमारे पाचशे एकरांतील द्राक्ष बागेला या चक्रीवादळचा फटका बसला आहे.
आधी कोरोना नंतर अतिवृष्टी आता निवारा चक्रीवादळ या नैसर्गिक संकटामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. कोरोनाकाळात शेतीमाल असून लॉकडाऊनमुळे कुठे पाठवता आला नाही. अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. भाजीपाल्यावर रोगराई पसरली. द्राक्ष बागेत पाणी साचून राहिल्याने द्राक्ष वेलीची मुळकुज झाली. या संकटावर मात करत पुन्हा जोमाने शेतकरी कामाला लागले. भाजी, कांदा लागवड करण्यास सुरवात केली. तर द्राक्ष बागायतदारांनी बागेतील पाणी बाहेर काढून बागेची छाटणी केली.
वेलीवर लहान लहान टपोरे घड आले. मात्र मागील दोन दिवसांपासून बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्यामुळे निवारा चक्रीवादळाने तमिळनाडू धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळाचा फटका मात्र भागातील भाजीपाला, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या चक्रीवादळमुळे ढगाळ वातावरण, पावसामुळे द्राक्षांच्या वेलीवर फुगू लागलेले घड ढगाळ वातावरणामुळे जिरू लागले आहेत. त्यामुळे द्राक्ष बागेवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाणार आहे.
दोन एकरांत द्राक्ष बागेची लावण केली आहे. आज अखेर बाग उभी करण्यासाठी पंधरा लाखांचा खर्च केला आहे. अतिवृष्टीमुळे महिन्याभर उशिरा छाटणी केली. अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या ठिकाणाच्या वेलीची मुळकुज झाल्याने छाटणीनंतरही या ठिकाणाच्या वेलीवर द्राक्षांचे घड आले नाहीत. चक्रीवादळामुळे तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरू लागले आहेत. त्यामुळे सध्या बागेचे नुकसान सुरू आहे.
- अमोल भोसले, द्राक्ष बागायतदार शेतकरी
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली