साताऱ्याच्या विकासात "आयकॉनिक' भर : उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

या स्पर्धेतील निवडक 32 इमारत आराखड्यांचे प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ता. 13 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विनामुल्य खुले ठेवल्याची माहिती संयाेजकांनी दिली.
 

सातारा : "आयकॉनिक सातारा'च्या माध्यमातून साकारणाऱ्या पालिकेच्या नवीन नियोजित इमारतीमुळे सातारा शहराची नवीन ओळख होवून साताऱ्याच्या विकासात आयकॉनिक भर पडेल. ऐतिहासिक, निसर्गसंपन्न व पर्यटन क्षेत्रामुळे नावलौकिक असलेला साताऱ्याचा चेहरामोहरा बदलू शकतो. आदर्श शहर म्हणून लोक आकर्षित होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या दहा डेस्टिनेशनमधील ठिकाणांमध्ये साताऱ्याचा समावेश करू, असे प्रतिपादन माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

 
सातारा पालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या संकल्प रेखांकनासाठी घेण्यात आलेल्या "आयकॉनिक सातारा' या वास्तू विशारदांच्या देश पातळीवरील स्पर्धेत पुणे येथील आर्किटेक्‍ट कल्पक भंडारी, जयंत धरप, विनोद धुसिया यांच्या विकास स्टुडिओ या कंपनीला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांच्यासह इतर विजेत्यांना उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.

विक्रमसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍टचे महाराष्ट्रचे अध्यक्ष सतीश माने, उपाध्यक्ष किशोर शिंदे, सातारा शाखेचे अध्यक्ष मयुर गांधी, सचिव विपुल साळवणकर, स्पर्धेतील निवड समितीचे सदस्य नामवंत वास्तूविशारद नितीन किल्लावाला, चंद्रशेखर कानेटकर व संजय पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी स्पर्धेतील सर्वोत्तम 12 आराखड्यांचा समावेश असलेले कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात पार पडला.
 
उदयनराजे म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात मोठे वास्तुविशारद होते. त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची वास्तुशैली वेगवेगळी आहे. सातारा आता आयकॉनिक सातारा ही ओळख संपादन करेल. ही इमारत साकारण्यासाठी जमीन नाममात्र किंमतीत दिलेल्या बाबासाहेब कल्याणी यांचे विशेष योगदान असून, त्यांच्या नावाने सभागृह उभे केले जाईल.''
 
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""सातारा पालिकेची नवीन इमारत साकारण्यासाठी आर्किटेक्‍ट असोसिएशन व पालिकेने मोलाचे प्रयत्न केले आहेत. या स्पर्धेत 200 हून अधिक वास्तुविशारदांनी नोंदणी करून 118 जणांनी आपले रेखांकन परिक्षण सादर केले. सातारा, कास व इतर पर्यटनाच्या सुधारणांसाठी तुम्ही पुढाकार घ्यावा. त्याला आमचा पाठिंबा असेल.''
 

गोरे साहेब... अन्‌... 
नुकत्याच झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत श्री. गोरे यांच्या निषेधाचा ठराव सभागृहाने घेतला. मात्र, आजच्या कार्यक्रमात गोरे व्यासपीठावर होते. तर निषेध करणारे नगरसेवक प्रेक्षकांच्या रांगेत होते. शिवाय, उदयनराजेंनी अनेकदा गोरे साहेब असा उल्लेखही भाषणात केला. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे चेहरे मात्र पडल्याचे जाणवत होते. 

 

स्पर्धेचा निकाल असा...

प्रथम बक्षिस (अडीच लाख) : विकास स्टुडीओ, पुणे 
द्वितीय बक्षिस (दीड लाख) : डिझाईन कॉर्डस्‌, पुणे 
तृतीय बक्षिस (एक लाख) : कॉज ऍन इनिशिएटिव्ह, नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Iconic" helped on Satara's development says Udayanraje