प्रेमविवाह करताय... केलाय... हे वाचाच

विशाल पाटील 
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सूर्यवंशम चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि सौंदर्या यांची प्रेमकहाणी जशी आहे, तशीच अगदी वास्तविकतेतही घडत आहेत. मात्र, सूर्यवंशमधील कहाणी पूर्णत्वाला जाते, येथे मात्र बहुतांश कहाणी अपूर्ण राहत आहे. "एमपीएससी'ची पूर्व परीक्षा पास झालेली मुलगी टेम्पोवाल्याबरोबर प्रेमविवाह करते. मात्र, अवघ्या काही महिन्यांत संसार तुटून पडतो.

सातारा : "प्रिये, जगू कसा तुझ्याविना... तूच माझा राजा अन्‌ मीच तुझी राणी', तुझ्यासाठी चंद्र, तारे आणेन तुझ्या चरणी, सात जन्म सोबत राहीन...' अशा आणाभाका घेणारे प्रेमवीर विवाह करतात खरे. पण, विचारांची अपरिपक्‍वता, विचारांचे सूत न जुळणे, वास्तविकता वेगळीच असणे आदी कारणांमुळे महिला समुपदेशन केंद्रात दाखल होणाऱ्या दाव्यांमधील तब्बल 80 टक्‍के प्रेमविवाहितांच्या संसाराचा धागा तुटतोय, हे भीषण वास्तव समोर येत आहे. 

हे वाचा - अश्‍विनीची ‘दंगल’!

अलीकडे समाजामध्ये प्रेमविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलीची 18 वर्षे पूर्ण होताच, शासकीय सोपस्कार उरकून कोणत्या तरी मंदिरात जावून प्रेमविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यापुढील भयावह वास्तव म्हणजे प्रेमविवाहात घटस्फोट होण्याचे प्रमाणे पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या विवाहांमध्ये अत्यंत जास्त आहे. 

महिला व बालविकास विभागाच्या सातारा तालुका पोलिस ठाण्यातील स्वयंसिध्दा सेवा संस्थेच्या समुपदेशन केंद्रातून माहिती जाणून घेतली असता, दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी 80 टक्‍के प्रेमविवाहाचे खटल्यांचे घटस्फोटात रूपांतर होत आहे. महिन्याकाठी सरासरी दोन ते चार खटल्यांमध्ये प्रेमविवाहांचा भंग होत आहे, हे दुर्दैव आहे.

हेही वाचा - Video : आजी-आजोबांचे हक्काचे घर : मातोश्री वृद्धाश्रम

याशिवाय, एकमेकांवर संशय, पती अथवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध, व्यसनाधिनता, कौटुंबिक जाचहाट आदी कारणांमुळे संसाराची घडी विसकटत आहे. अलीकडे सासू जाच करते म्हणून घटस्फोट घेण्याची प्रकरणे कमी होत आहेत. 

आवश्‍‍य वाचा - सावधान! SBI मध्ये या गोष्टी अपडेट केल्या नसतील तर व्यवहार...

प्रेमविवाहानंतर मुलीला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून मुलीचे मन वळवून घटस्फोट घेण्यास मुलीस भाग पाडले जाते. वेळप्रसंगी तू विवाह मोडला नाही तर आम्ही आत्महत्या करू, अशी धमकीही दिली जाते. जिल्ह्यातील काही राजकीय, डॉक्‍टर, आयटी कुटुंबांनीही असे केले आहे. लग्न केल्यानंतर मुलामध्ये शारीरिक, लैंगिक दोष असल्याचे समोर येते. त्यामुळे घटस्फोट घेण्याची चार महिन्यांत तीन प्रकरणे घडली आहेत. 

काही महिन्यांत संसार तुटतोय
सूर्यवंशम चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि सौंदर्या यांची प्रेमकहाणी जशी आहे, तशीच अगदी वास्तविकतेतही घडत आहेत. मात्र, सूर्यवंशमधील कहाणी पूर्णत्वाला जाते, येथे मात्र बहुतांश कहाणी अपूर्ण राहत आहे. "एमपीएससी'ची पूर्व परीक्षा पास झालेली मुलगी टेम्पोवाल्याबरोबर प्रेमविवाह करते. मात्र, अवघ्या काही महिन्यांत संसार तुटून पडतो. 

आणखी वाचा - लग्नापूर्वीचं छायाचित्रण करायचंय! नवी मुंबईतील ही ठिकाणं आहेत बेस्ट

या केंद्रामध्ये 2016 पासून एक हजार 69 प्रकरणे दाखल झाली. त्यातील 981 प्रकरणांमध्ये तडजोडी झाल्या असून, त्या संसारवेली पुन्हा बहरल्या आहेत. संसाराचा गाडा आनंदी राहण्यासाठी पती, पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे, विश्‍वास ठेवला पाहिजे. नोकरी, व्यवसायाबरोबर कुटुंबीयांशी संवाद ठेवला पाहिजे. परिपक्‍व विचाराअंतीच प्रेमविवाह करावा.
-आरती राजपूत 
समुपेशक, सातारा 

महिला समुपदेशन केंद्राचा घोषवारा 
(सातारा तालुका पोलिस ठाणे) 

दाखल प्रकरणे : 1069 
तडजोड प्रकरणे : 981 
प्रलंबित प्रकरणे : 88 
एकदाच हस्तक्षेप : 126 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If your Planning of Love Marriage or Already Done Read It Carefully