पीक कर्जासाठीची खटपट येणार अंगलट

पीक कर्जासाठीची खटपट येणार अंगलट

कोल्हापूर - शासनाने पीक कर्जासाठी विशेष सवलत दिली आहे. याच सवलतीचा गैरफायदा घेऊन तब्बल ४०० जणांनी आयडीबीआय बॅंकेला आठ कोटींचा चुना लावला. या सर्वांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे यासाठी खोटी कागदपत्रे तयार करणारी साखळीच तयार झाली. फसवणुकीला बॅंक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरला आहे.

शासन शेतकऱ्यांना कमी व्याज दरात व दीर्घ मुदतीची पीक कर्ज देते. त्यासाठीची प्रक्रिया किचकट नाही. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा म्हालसवडे आरळे, घानवडे व तारळेवाडी गावांतील काही अल्पभूधारक व भूमिहीन लोकांनी घेतला आहे. २५ हजार रुपयांसाठी एकाने खोटी कागदपत्रे सादर करून सुरू केलेली ही फसवणूक दोन वर्षांत तब्बल आठ कोटींवर पोचली. विशेष म्हणजे, फसवणुकीचा हा ‘फंडा’ कर्णोपकर्णी चार गावांत पोचला. यातून खोटी प्रतिज्ञापत्रे व अन्य कागदपत्रे तयार करून देणारी यंत्रणा तयार झाली. यातून काहींनी लाखो रुपये कमिशनही मिळवले.

बॅंकेचे अधिकारी बदलल्यावर व पीक कर्जाची मुदत संपल्यावर या फसवणुकीचा उलगडा झाला आहे. आता बॅंकेची व पर्यायाने शासनाची फसणूक करणे संबंधितांना महागात पडण्याची शक्‍यता आहे. बॅंकेची व शासनाची फसवणूक करताना आपण अप्रत्यक्षपणे स्वतःचीच फसवणूक करत आहोत याची कल्पना संबंधितांना आली नाही.

कल्पना असूनही फसवणूक 
खोटी कागदपत्रे सादर करून आपण फसवणूक करत आहोत, हे संबंधितांना माहीत होते; पण शेजाऱ्याला मिळाले मग मला का नको, या प्रवृत्तीतून कर्जाचा आकडा वाढत गेला. एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांनी नावावर जमिनी दाखवून ५० हजारांपासून ते तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज घेतले, तर काहींनी याच कागदपत्रांच्या आधारे गृह कर्जही घेतले.

असाही फायदा मिळवण्याचा हेतू
या प्रकरणात गावातील काहींनी आधी स्वतः फायदा करून घेतला. नंतर पुढाकार घेत अनेकांना कर्जे मिळवून दिली. मदतीच्या माध्यमातून राजकीय फायदा मिळवण्याचा त्यांचा हेतू होता.

महिला अनभिज्ञ 
कर्ज मिळवण्यासाठी कुटुंबप्रमुखाने महिलांच्या नावावरही कागदोपत्री जमीन दाखवली. कागदपत्रांवर सही करताना आपण कोणत्या कागदावर सही करत आहोत, याची कल्पनाही काही महिलांना नव्हती. 

नुकसानीची जबाबदारी
शेती व पाईपलाईनसाठी कर्जाच्या बहाण्याने बनावट कागदपत्रे करून आयडीबीआय बॅंकेच्या वरणगे शाखेत कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेला मुख्य सूत्रधार संतोष बळवंत पाटील (वय ३२, रा. आरळे) याच्या चौकशीतून या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. तत्कालीन बॅंक अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच फसवणूक झाल्याचा अंदाज असून, फसवणूक झालेल्या रकमेची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेणार असल्याचे करवीर पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com