esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांना आकर्षण 50 रुपयाच्या पुडीचे

गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे जग थांबले असताना गांजाच्या तस्करीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे.

तरुणांना आकर्षण 50 रुपयाच्या पुडीचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जत : कर्नाटक सीमेला जोडलेला जत तालुका नेहमी वेगवेगळ्या कारणांनी व घटनांनी जिल्ह्यात चर्चेत आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गाव सोडण्यास भाग पाडते, तर ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून आज ही ओळख तशीच आहे. दुसरीकडे गांजा तस्करीसह इतर अवैध धंदे व गुन्हेगारी क्षेत्रातही पिढी उतरत आहे. हिवरे, कोसारी, कोंतेवबोबलाद, तिकोंडी व उमदीसह परिसरात नव्याने शेतात गांजा पिकवला जातो अन्‌ तो खुलेआम विकला जातो आहे, असेच चित्र पहायला मिळत आहे.

गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे जग थांबले असताना गांजाच्या तस्करीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. तस्करांना पोलिसांचे व कायद्याचे भय नाही. पोलिसांकडून देखील गांजा तस्करीचे मूळ शोधले जात नाही. गेल्या वर्षभरात गांजा तस्करीवर एकही कारवाई नाही. त्यामुळे तस्करीला चालना मिळत आहे. २०२० मध्ये सुरवातीला उमराणी, सिंदूर, सिंगनहळ्ळी गावात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने व जत पोलिसांकडून मोठी कारवाई करून शेतातील पिकवलेला ओला गांजा जप्त केला होता. यानंतरही अनेक ठिकाणी शेतात गांजा पिकवला जात आहे.

जत शहरासह कर्नाटक राज्यात तस्करांनी धुमाकूळ घातला असून तस्करीचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. काही महिन्यांपूर्वी जत शहरातील एका अल्पवयीन तरुणाला कोल्हापूर परिसरात गांजाची तस्करी करत असताना तेथील स्थानिक पोलिस पथकाने त्याला अटक करून कारवाई केली होती. शिवाय कर्नाटक सीमेवर असलेल्या टोळ्याही पूर्णपणे सक्रिय झाल्या असून, कर्नाटक महाराष्ट्र राज्यात रात्री अपरात्री चोरटी वाहतूक सुरू आहे. याला वेळीच आवर घालण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून पावले उचलण्याची गरज आहे.

पोलिसांसमोर आव्हान

गेल्या वर्षी उमराणी, सिंदूर व सिंगनहळ्ळी गावात कारवाईत आठशे किलोचा गांजा पकडा गेला. या मोठ्या कारवाया होत्या. यानिमित्ताने गांजा तस्करीला काहीसा आळा बसला. मात्र, कोरोना महामारीत नव्याने गांजा शेतीला वाव मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गांजाची तस्करी रोखण्याचे आव्हान जत पोलिसांसमोर असणार आहे.

जत शहरात खुलेआम गांजाची विक्री

कर्नाटक-महाराष्ट्र राज्यात चोरट्या गांजा तस्करीने अनेक तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढतच चालली आहे. शिवाय जत शहरात प्रमुख ठिकाणी गांजा विकला जातो आहे. पन्नास रुपयांच्या पाकिटात दोन खंब्याची नशा मिळत असल्याने तरुणांना वेगळ्याच वाटेवर नेऊन ठेवले आहे. पोलिसांसाठी ही किरकोळ कारवाई असली, तरीही यावर मोठी जरब बसू शकते. मात्र, याकडे पोलिसांनी सोयीस्कर डोळेझाक केल्याने खुलेआम गांजा विक्रीला प्रोत्साहन मिळत आहे.

"जत तालुक्यातील गुन्हेगारी, अवैध धंदे, भुरट्या चोरांवर ठोस कारवाईसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली असून, गांजा तस्करीसह इतर अवैध धंद्यांवर वचक बसावा यासाठी कडक कारवाई केली जाईल. कशाचीही गय केली जाणार नाही. कोणलाही बेकायदा घटनांची माहिती मिळाल्यास आमच्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल."

- उदय डुबल, पोलिस निरीक्षक, जत

loading image
go to top