डोक्‍यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून बेकायदा काम 

युवराज पाटील - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - डोक्‍यावर बर्फ आणि जिभेवर साखर असलेल्यांची माध्यमिक विभागात चलती आहे. बेकायदा काम मार्गी लावण्यासाठी ही मंडळी पळवाट दाखवून देतात. त्यांचा हिस्सा दिला की "केबिन'चा वेगळा हिशेब शिक्षकांना करावा लागतो. धक्कादायक बाब अशी, की काही शिक्षक नेते अधिकाऱ्यांना पाठबळ देतात. त्यामुळे ते शिक्षकांचे नेते आहेत की मध्यस्थ, असा प्रश्‍न शैक्षणिक वर्तुळाला पडला आहे. 

कोल्हापूर - डोक्‍यावर बर्फ आणि जिभेवर साखर असलेल्यांची माध्यमिक विभागात चलती आहे. बेकायदा काम मार्गी लावण्यासाठी ही मंडळी पळवाट दाखवून देतात. त्यांचा हिस्सा दिला की "केबिन'चा वेगळा हिशेब शिक्षकांना करावा लागतो. धक्कादायक बाब अशी, की काही शिक्षक नेते अधिकाऱ्यांना पाठबळ देतात. त्यामुळे ते शिक्षकांचे नेते आहेत की मध्यस्थ, असा प्रश्‍न शैक्षणिक वर्तुळाला पडला आहे. 

अपवाद वगळता माध्यमिकच्या कारभाराबाबत गेल्या पंधरा वर्षांत सातत्याने तक्रारी झाल्या. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी पुढे यावे यासाठी सरकारने प्राधान्य दिले; मात्र काही महिला अधिकारी इतक्‍या तयारीच्या निघाल्या, की काही खात्यात पुरुष अधिकारीही मागे पडले. माध्यमिक विभाग आताच गैरमार्गाच्या विळख्यात सापडला आहे असे नाही. वेतनश्रेणी मंजुरीपासून ते मुख्याध्यापकांची मान्यता, संचमान्यता अशा प्रत्येक कामात "अर्थ' शोधणारी मंडळी येथे आहेत. 

वर्षानुवर्षे कामाचा असलेला अनुभव म्हणून काही व्यक्तींकडे पाहिले जाते. कामानिमित्ताने एखादा आलाच तर त्याचे स्वागत असे काही होते, की काम मार्गी लागणार असा त्याचा समज होतो. जिभेवर साखर आणि डोक्‍यावर बर्फ असल्यासारखी ही मंडळी काम करतात. कामात अशी खोच मारली जाते की अमुक एवढे दिल्याशिवाय ते मार्गी लागणारच नाही याची जाणीव करून दिली जाते. पळवाट कशी शोधता येईल याचीही माहिती दिली जाते. वाट दाखविणाऱ्याचा हिस्सा, टेबलचे वेगळे आणि केबिनचे वेगळे देण्याची तयारी असली की अवघडातील अवघड काम मार्गी लागते. 

काही अधिकारी, कर्मचारी पळवाटा दाखवितात; मात्र काही शिक्षक नेते म्हणवून घेणारी मंडळी अलीकडे "माध्यमिक'च्या हाताला लागली आहेत. एरवी शिक्षकांच्या प्रश्‍नांवरून आंदोलने करायला हीच मंडळी पुढे आणि अधिकाऱ्यांना कमाई करून देण्यातही तेच पुढे असे चित्र निर्माण झाले आहे. नेमके कुठल्या पुढाऱ्याकडे गेले की काम लवकर होते याची माहिती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आहे. एरवी राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे शिक्षक नेते माध्यमिकच्या कारभाराबाबत मात्र तोंडावर हात ठेवून गप्प आहेत. "तू हसल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो' अशी स्थिती आहे. 

शिक्षक नेत्यांकडून पाठराखण... 

मुख्याध्यापकाच्या मान्यतेसाठी 35 हजारांची लाच घेताना सावर्डेकर जाळ्यात सापडला खरा; पण या रकमेचे आणखी वाटेकरी कोण, याची माहिती लाचलुचपत विभागाने घेतली तर धक्कादायक नावे समोर येतील अशी स्थिती आहे. गैरमार्गाचा अवंलब करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यापेक्षा काही शिक्षक नेते त्यांची पाठराखण करतात यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले तर जाब विचारायचा कुणाला, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. लाच प्रकरणामुळे आठवडाभर चर्चा होईल, पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' असा कारभार सुरू होईल. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. ती तडीस न्यावी, अशीच अपेक्षा प्रामाणिक शिक्षकांतून व्यक्त होत आहे. 

Web Title: illegal work keeping sugar on the tongue