११ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यासाठीची सभा गणपूर्तीअभावी रद्द

पालिकेच्या इतिहासातील अशी ही सभा असावी
पालिकेच्या इतिहासातील अशी ही सभा असावीsakal

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर असलेल्या सुमारे ११ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेली आजची विशेष सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने गणपूर्तीअभावी ही सभा रद्द करण्यात येत असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. या सभेत राष्ट्रवादीच्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला विकास आघाडीचे ११ सदस्य उपस्थित होते. गणपूर्तीअभावी सभा रद्द करावी लागली. शासनाच्या नगरविकास विभागाने नगरपरिषद कार्यक्षेत्रासाठी विशेष रस्ता अनुदान म्हणून अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

पालिकेच्या इतिहासातील अशी ही सभा असावी
First Time Voter : मतदान ओळखपत्र हवेय; पण ते कसं काढायचं?

शिवसेनेचे नेते, नगरसेवक आनंदराव पवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता; परंतु या सभेला राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी तसेच अपक्ष आघाडीचे उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनी या सभेकडे पाठ फिरवली. ही सभा रद्द करावी लागल्यावरून आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवत जोरदार निषेध नोंदवला. मला आत्ताच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा फोन आला होता आणि त्याच्याकडून असे समजले की त्यांच्या मोठ्या नेत्याने या सभेला कुणी जाऊ नये असा आदेश दिल्यामुळे नगरसेवक गैरहजर राहिले आहेत असे म्हणत त्यांनी शहराचा विकास त्यांना बघवत नाही, हे आज स्पष्ट झाले आहे.

यातील काही निधी राष्ट्रवादीच्या प्रभागातही खर्च होणार होता; मात्र तरीही राष्ट्रवादीने घेतलेल्या या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक शकील सय्यद यांनीही राष्ट्रवादीवर टीका केली. गेल्या तीस वर्षात शहर भकास झाले आहे. रस्ते शोधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. राष्ट्रवादी नेत्यांच्या सत्ताकाळात रस्त्यांसाठी आलेला निधी दाबून ठेवला गेला. भुयारी गटारच्या कामाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरल्याने राष्ट्रवादीचा निषेध करत असल्याचे मत नोंदवले.

विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना महा विकास आघाडी सरकारचा हा निधी असल्यामुळे राष्ट्रवादी या निर्णयात आनंदाने सहभागी व्हायला हवी होती; परंतु त्यांना विकासाशी देणेघेणे नाही अशी टीका केली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ३१ मार्च २२ पूर्वी हा निधी खर्च होणे आवश्यक असल्याचे सांगत हा निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च व्हायला हवा, अन्यथा पालिकेचे आर्थिक नुकसान होईल. कोणत्याही नगरसेवकाला असे नुकसान करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते. याची नोंद घेतली जाईल. अतिनिकडीची सभा म्हणून याकडे पाहणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीने असे का केले समजत नाही. राज्य शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन अयोग्य असल्याचे मत नोंदवत गणपूर्तीअभावी सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

चौकट : पुढची सभा शनिवारी

आज रद्द करण्यात आलेली विशेष सभा आता शनिवारी (ता.१३) साडे ११ वाजता होणार असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com