फत्तेसिंगराव नाईक स्मृतीस्थळाचे आज शरद पवांराच्या हस्ते उद्‌घाटन

शिवाजी चौगुले
Friday, 22 January 2021

लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते उद्या (ता. 22) होणार आहे.

शिराळा (जि. सांगली) : लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते उद्या (ता. 22) होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

यावेळी नाईक म्हणाले, शुक्रवारी (ता. 22) स्व. फत्तेसिंगअप्पा व आई स्व. लीलावती नाईक यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने शिराळा विधानसभा मतदार संघ व शाहूवाडी तालुक्‍याच्या विकासासाठी भगिरथ प्रयत्न करणाऱ्या अप्पांच्या स्मृति चिरंतन जतन व्हाव्या म्हणून कारखाना कार्यस्थळावर त्याचे स्मृतीस्थळ व पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

स्व. अप्पांचे संपुर्ण जीवन संघर्षात गेले. त्यांचे जीवन सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी समर्पित होते. त्यांनी शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रासह कष्टकरी, शेतकरी व समाजाच्या तळागाळापर्यंत राबणाऱ्या हातासाठी केलेल्या कामाची हे स्फूर्तिस्थळ आपणास चिरंतन प्रेरणा देत राहील. 

यावेळी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूणअण्णा लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख प्रमुख उपस्थित असणार आहेत. 

हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता कारखाना कार्यस्थळावर चिखली येथे होईल. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील असलेल्या शिराळा, शाहुवाडी तसेच वाळवा तालुक्‍यातील लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

संपादन :  युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Fatehsingrao Naik Memorial today by Sharad Pawar