पाणीसाठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध केला जाईल - चंद्रकांत पाटील

रुपेश कदम
सोमवार, 14 मे 2018

मलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा शक्ती हा चिंतेचा विषय आहे असेही ते म्हणाले.

मलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा शक्ती हा चिंतेचा विषय आहे असेही ते म्हणाले.

नरवणे (ता. माण) येथे श्रमदान केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी गोरख शेलार, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, जिल्हा नियोजन सदस्य बाळासाहेब खाडे, बिल्डर्स असोसिएशन साताराचे चेअरमन सयाजी चव्हाण, माजी सैनिक आघाडी साताराचे जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, माण युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप भोसले,   सरपंच दादासो काटकर, समीर ओंबासे, दादा दडस, दाजीराम पवार, किरण कदम, ह.भ.प. नारायण गंबरे, दादासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले, पाऊस पडत नाही असं एकही गावं नाही. गरज आहे ती पडलेल्या पावसाचं पाणी अडविण्याची, साठवण्याची, जिरविण्याची. माण व खटाव तालुक्यात मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे कायम दुष्काळी असणारे हे तालुके राज्यात सर्वात जास्त पाणीदार होतील. राज्याचं उत्पन्न वाढत असून चांगल्या कामाला विशेषतः पाण्याच्या कामाला शासन पैसा कमी पडू देणार नाही. जमिनीतील पाणीसाठा वाढविण्यासाठी जेवढी कामं करता येतील तेवढी करा. कारण जलयुक्त शिवार हा या शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. 

अनिल देसाई म्हणाले की, श्रमदानात महिला पुरुषांपेक्षा जास्त संख्येने सहभागी आहेत. वर्षानुवर्षे महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली घेण्याची भूमिका महिलांनीच घेतली आहे. गावं पाणीदार करण्यासाठी सर्वजण श्रम घेत आहेत. यामुळे नक्कीच भूजल पुनर्रभरण होणार आहे. या कामात मदत म्हणून भाजपच्या माध्यमातून डिझेल व मशिन दिल्या जात आहेत. यावेळी अनिल देसाई यांनी उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात सोडण्यासाठी अपूर्ण कालव्याचे काम तातडीने पुर्ण करुन दहिवडी, गोंदवले परिसरातील पाणी प्रश्न सोडवावा. नरवणे-दोरगेवाडी-कातरखटाव या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. टंचाईतून पैसे देवून उरमोडीचे पाणी काही कालावधीसाठी सोडावे अशा मागण्या केल्या.

यावेळी नरवणे ग्रामस्थांच्या सोबत फलटण येथील डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटीचे पाचशे विद्यार्थी, जाधववाडी येथील शंभर ग्रामस्थ, सातारा येथील बिल्डर असोसिएशनच्या सदस्य यासह अनेकांनी श्रमदान केले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अनिल देसाई यांच्या कामाच्या पध्दतीचे कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, देसाई यांनी माणच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने टेंभू, उरमोडी योजनेला गती मिळाली.  त्यांना शब्द दिला की ते काम पूर्ण होईपर्यंत देसाई चिकाटी सोडत नाहीत.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पिंपरी-धामणी-गटेवाडी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा गटेवाडी येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for increase level of water we can available money said by chandrakant patil