esakal | कर्नाटकात प्रवासासाठी वाढल्या कोरोना तपासण्या अन्‌ बाधितही 
sakal

बोलून बातमी शोधा

Increased corona checks for travel in Karnataka

सांगली जिल्ह्यातील विशेषतः सीमा भागातील लोकांच्या कोरोना चाचण्या वाढल्या असून त्यामुळे बाधितांची संख्याही वाढली आहे. 

कर्नाटकात प्रवासासाठी वाढल्या कोरोना तपासण्या अन्‌ बाधितही 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः कर्नाटकात प्रवेश करवयाचा असेल तर कोरोना तपासणीचा अहवाल सोबत असणे आवश्‍यक आहे. कोरोना बाधितांना कर्नाटक प्रवेश बंद करण्यात आला आहे. खासगी वाहनांसह एसटी बसेसही तपासल्या जात आहेत. परिणामी, जिल्ह्यातील विशेषतः सीमा भागातील लोकांच्या कोरोना चाचण्या वाढल्या असून त्यामुळे बाधितांची संख्याही वाढली आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढला आहे. जिल्ह्यातील स्थिती दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावरील असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आठवडा बाजार बंद केले आहेत. जिल्ह्यातील बाधित संख्या वाढण्यामागे तपासण्या वाढल्याचे स्पष्ट आहे.

मिरज आणि जत तालुक्‍यातून कर्नाटकात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या आढवड्यात एकाच दिवशी जिल्ह्यातील 230 जणांना बाधा झाली होती. त्यापैकी 27 रुग्ण जत तालुक्‍यातील तर 27 रुग्ण मिरज तालुक्‍यातील होते. कर्नाटकशी सीमा भागाचा रोटीबेटी व्यवहार आहे. तेथील आठवडा बाजारांसाठी जिल्ह्यातून व्यापारी जातात. तेथील व्यापारी येथे येतात. त्यामुळे या व्यवहारात कोरोनाची तपासणी आता महत्त्वाची झाली आहे. 


याआधी केवळ खासगी वाहने तपासली जात होती. त्यामुळे एसटीतून प्रवास सुरू झाला होता. आता एसटी बसेस अडवून तपासणी केली जात आहे. आता साऱ्यांनाच तपासणीशिवाय पर्याय उरलेला नाही. दुसरीकडे कर्नाटकच्या जंगली सीमा भागात (कर्नाटकचा कोकण) शिमगा महोत्सव जोरात असतो.

होळीला सगळे लोक गावी जातात. त्यामुळे बांधकाम व मजुरीसाठी महाराष्ट्रात आलेल्या प्रचंड संख्येने लोकांनी तपासण्या करून घेतल्या आहेत. त्यातही काही बाधित आढळले आहेत.

संपादन : युवराज यादव