esakal | ‘निगम’च्या पदासाठी वाढल्या हालचाली | Belgaum
sakal

बोलून बातमी शोधा

cm chair

‘निगम’च्या पदासाठी वाढल्या हालचाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : मंत्रिमंडळ विस्ताराची एकीकडे चर्चा सुरू असताना निगम पदांसाठी अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यामध्ये नेतृत्व बदलावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तर त्याजागी मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांची वर्णी लागली आहे. यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारिकरणासोबत आता ‘निगम’पदांसाठी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी चाचपणी सुरु आहे. दरम्यान, राज्यात हालचाली सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील इच्छुकांनी पदे पदरामध्ये पाडून घेण्यासाठी आतापासून ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरू केले आहे.

मागील सुमारे दीड ते दोन वर्षापासून निगमपदे रिक्त आहेत. विविध कारणांनी अध्यक्ष आणि सदस्यांची निवड त्याठिकाणी होऊ शकली नाहीत. यामुळे पन्नासपेक्षा अधिकपदे रिक्त आहेत. त्यामुळे याबाबत बैठक घेतली असून, पदाधिकारी निवडीबाबत हालचाली सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात ८० पेक्षा अधिक जणांची निगमची पदे भरण्यात आली होती. पण, आता नवीन मुख्यमंत्र्यांकडे याची जबाबदारी आहे. मंत्रिमंडळ विस्तारीकरण आणि निगमची रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आमदारांची नावे आघाडीवर असून ५० पेक्षा अधिक जणांची नावे पुढे आली आहेत.

राज्यात पुढील दीड ते दोन वर्षात विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी पक्ष संघटना व पदाधिकाऱ्यांसाठी अधिक सक्रिय बनविण्यासाठी भर दिली जात आहे. त्याचाच भाग म्हणून निगमची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पदाधिकारी, सदस्यांची निवड करण्याची तयारी सुरु झालेली आहे. आमदार आणि पदाधिकाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. त्यासाठी बेळगाव व चिक्कोडी जिल्ह्यातील इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यासोबत तयारी सुरू केली आहे. पक्षातील ज्येष्ठांच्या गाठीभेटी व फिल्डिंग लावण्यास सुरू केली आहे. त्यामुळे एकीकडे मंत्रिपदासाठी पाठपुरावा सुरू झाला असताना निगमपदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी केली आहे.

loading image
go to top