आमचं ठरलंय,चिकन घरी आणायचं,मटण पाहुण्यांच्या घरी खायचं

निवास चौगुले
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरातून राज्यभर पोचलेल्या "आमचं ठरलंय' ही टॅगलाईन पडकून सोशल मीडियातून मेसेज व्हायरल होत आहेत. "आमचं ठरलंय, चिकन घरी आणायचं, मटण पाहुण्यांच्या घरी खायचं आणि येताना म्हणायचं, आम्ही पुन्हा येणार, आम्ही पुन्हा येणार' असे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत.

कोल्हापूर - शहर आणि शहराला लागून असलेल्या गावांतील मटणाचे दर वाढवल्याने त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बकऱ्यांची टंचाई आहे, त्यामुळे बकऱ्यांचेच दर वाढल्याने मटणाच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत खाटिक व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. 
दरम्यान, या दरवाढीविरोधात कसबा बावडा येथे रविवार (ता. 17) मटण दरवाढ कृती समितीने बैठक बोलवली असून त्याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. बालिंगे ग्रामपंचायतीनेही जून 2019 मध्ये एक पत्रक प्रसिद्ध करून प्रतिकिलो 400 रुपये दरानेच मटण खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. तथापि, या गावांतही मटणाचे दर प्रतिकिलो 540 ते 580 रुपयांपर्यंत आहेत. 

दर वाढल्याने खवय्यांची पंचाईत 

कोल्हापूर हे खवय्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातही मटणाचे शौकिन जास्त आहेत. दर बुधवार, रविवार न चुकता मटण खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शहरात मासांहारी हॉटेल असूनही सर्वत्र खवय्यांची गर्दीही असते. काही प्रसिद्ध हॉटेलमध्ये तर रात्री दहानंतर जेवणच मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अलीकडे मटणाच्या दरात मोठी वाढ झाली असली तर या हॉटेल मालकांनीही जेवणाच्या दरात फारशी वाढ केलेली नाही; पण मार्केटमध्ये मात्र मटणाचे दर प्रतिकिलो 600 रुपयांपर्यंत पोचले आहेत. 
शहरात काही भागात हा दर 580 रुपये तर शहराला लागून असलेल्या बालिंगा, वडणगे, उचगाव, पाचगाव, कोपार्डे यासारख्या मोठ्या गावांत हा दर शहरापेक्षा प्रतिकिलो 20 ते 40 रुपयांनी कमी आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी 400 ते 450 रुपये प्रतिकिलो असलेला कसबा बावडा व परिसरातील दर 600 रुपयांवर पोचला आहे. याला विरोध करण्यासाठी बावड्यात उद्या (ता. 17) बैठक बोलवली आहे. त्यात मटण दरवाढीला विरोधाचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing The Rate Of Meat In Kolhapur Angry Reactions Against