पुणे-बंगळूर महामार्गावर इंडिका कार जळून खाक; आगीत तीन लाखांचं नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indica car

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने आगीत संपूर्ण कार जळून भस्मसात झाली.

पुणे-बंगळूर महामार्गावर इंडिका कार जळून खाक

कणेरीवाडी (ता. करवीर) : येथील राष्ट्रीय महामार्गालगत (Pune-Bangalore National Highway) जाजल पेट्रोल पंपाजवळील कणेरी मठ (Kaneri Math) रोडवर रात्री साडेबाराच्या सुमारास चालत्या इंडिका कारला (Indica car) शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने आगीत संपूर्ण कार जळून भस्मसात झाली. यात चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच वेळीच घटनास्थळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) अग्निशमन दलाने (Fire Brigade) धाव घेऊन आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी, निवास आनंदा केसरकर (रा. सांगवडे, ता. करवीर) हे आपल्या हॉटेलमधील कामकाज आटोपून घरी परतत असताना त्यांच्या स्वमालकीच्या गाडीतून (क्र. एमएच -०९- ८३१४) अचानक धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर केसरकर यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून गाडी बाहेर पडले व क्षणात गाडीने पेट घेतला. केसरकर यांनी तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केले.

परंतु आगीची तीव्रता इतकी होती, की अग्निशमन दल पोहोचेपर्यंत गाडीचे सर्व रबर पार्ट, फायबर पार्ट, फॅब्रिक मटेरियल व इतर सर्व ज्वलनशील घटक जळून गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. परंतु, ही आग इतरत्र पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणून पुढील अनर्थ टाळला. या आगीमध्ये साधारणपणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलातील स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला, वाहन चालक किशोर गवळी, तांडेल, जयवंत डकरे, फायरमॅन अवधूत चव्हाण, शुभम कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

टॅग्स :fire brigadeKaneri Math