इंदोरीकर महाराज राजकारणात या, कुणी दिली ऑफर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

या व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली! सत्यजीत तांबे यांनी भाषणात विधानसभा निवडणुकीत इंदोरीकर महाराजांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेमुळे थोडे धास्तावल्याचा उल्लेख केला.

इंदोरीकर महाराज राजकारणात या, कुणी दिली ऑफर 
संगमनेर : समाजाचे भले करण्याची वैचारिक ताकद व क्षमतेमुळे समाजाचे प्रबोधन करण्याचा अधिकार इंदोरीकर महाराजांकडे आहे. त्यांचा राजकारणात प्रवेश झाला तर, ते तेवढ्याच ताकदीने राजकीय क्षेत्रातही काम करतील, अशी इच्छा सर्वच राजकीय मंडळींनी करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

हेही वाचा : शरद पवार म्हणजे देव माणूस 

ओझर बुद्रुक गावात झाले अभीष्टचिंतन 
आपल्या आगळ्या वेगळ्या प्रबोधनाच्या शैलीमुळे अफाट लोकप्रियता लाभलेल्या इंदोरीकरांचे राजकीय क्षेत्रातही चाहते आहेत. त्यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमाला आजी-माजी राजकीय नेत्यांची आवर्जुन हजेरी असते.

शनिवारी संगमनेर तालुक्‍यातील ओझर बुद्रूक येथील विद्यालयाच्या प्रांगणात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कार्यक्रमासाठी मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहीत पवार, आमदार आशुतोष काळे, दिवंगत आर. आर. पाटलांचे चिरंजीव रोहीत, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे आदीची उपस्थिती होती. 

सत्यजीत, तुझ्यासाठीही मतदारसंघ पाहतो 
या व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली! सत्यजीत तांबे यांनी भाषणात विधानसभा निवडणुकीत इंदोरीकर महाराजांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेमुळे थोडे धास्तावल्याचा उल्लेख केला. तोच धागा पकडून इंदुरीकर महाराजांच्या उमेदवारीची आम्हाला अपेक्षा होती; पण आम्ही आग्रह धरला नव्हता. आम्ही शक्‍य असेल तिथेच आग्रह धरतो. सत्यजीत, भविष्यात तुलाही मतदारसंघ शोधून द्यावा लागेल पण मामाला रिटायर कर... असे आमचे म्हणणे नाही... अशा शब्दांत आमदार विखे पाटील यांनी मिश्‍कील टिप्पणी केली. 

महाराजांच्या कीर्तनाचे फ्लेक्‍स गावोगावी

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे फ्लेक्‍स बोर्ड गावोगावी दिसतात. राजकारण्यांचे बोर्ड कमी झाले आणि महाराजांचे वाढले याकडे कटाक्ष टाकीत विखे म्हणाले, आता कोणताच कार्यक्रम इंदोरीकर महाराजांशिवाय होवू शकत नाही, एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली आहे. त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर.. ते राजकारणातही निश्‍चित अधिकार गाजवतील. विखे पाटील यांच्या या वाक्‍यानंतर उपस्थितांत हशा पिकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indorekar Maharaj Come into politics, who gave an offer