पालिकेच्या शाळेत निकृष्ट धान्य; वाटप थांबविले; पालक-सामाजिक कार्यकर्त्यांकडून पंचनामा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

यासंदर्भात शिक्षक, मनपा शिक्षणमंडळाच्या प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांना धारेवर धरले. परंतु बिराजदार यांनी जिल्हा परिषदेमार्फत थेट शाळांना पुरवठा होत असल्याचे सांगितले.

सांगली ः पोषण आहारअंतर्गत विद्यार्थ्यांना निकृष्ट व मुदतबाह्य निकृष्ट हरभरा, मूगडाळ वाटप होत आहे. हा प्रकार गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांत चव्हाट्यावर आल्यानंतर वाटप थांबविण्यात आले. पण पुन्हा महापालिका शाळांमध्ये तोच निकृष्ट साठा वाटप सुरू आहे. येथील पालिकेच्या शाळा क्र. 3 मध्ये असा पोषण आहार वाटपाचा कारभार पालक आणि सामजिक कार्यकर्त्यांनी पंचनामा करीत चव्हाट्यावर आणला. 

याप्रकरणी संबंधित पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. यासंदर्भात शिक्षक, मनपा शिक्षणमंडळाच्या प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांना धारेवर धरले. परंतु बिराजदार यांनी जिल्हा परिषदेमार्फत थेट शाळांना पुरवठा होत असल्याचे सांगितले. 

सध्या सर्व शाळा बंद आहेत. परंतु शासनाकडून पोषण आहाराचा पुरवठा घरपोहोच किंवा शाळांमध्ये वाटप करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ठेकेदार नियुक्त करून त्याचा पुरवठा केला जातो. याअंतर्गत तांदूळ, हरभरा व मूगडाळ असे धान्य दिले जाते. परंतु पोषण आहारातील निकृष्ट धान्यवाटपाचा अनेकवेळा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. 

अशाच पद्धतीने गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट, खडे मिश्रित, कुबट आणि त्यावर एक्‍स्पायरी तारीख नसलेला हरभरा, मूगडाळ वाटप सुरू होता. बेडग (ता. मिरज) येथे असा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी पंचनामा करीत याचे वाटप थांबविण्याचे आदेश दिले. परंतु अनेक शाळांमध्ये तत्पूर्वीच वाटप झाले होते. 

आता पुन्हा महापालिका शाळांमध्ये तो साठा वाटप होत होता. हे समजताच येथील शाळा क्र. 3 मध्ये सामाजिक कार्यकर्ते गॅब्रियल तिवडे यांच्यासह पालकांनी छापा टाकून पंचनामा केला. यावेळी मुख्याध्यापिका चित्रा शिंगाडे, शिक्षक सुरेश शिंगाडे यांच्यासह अन्य शिक्षकांनी हे वाटप थांबविले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inferior grain in municipal school; Allocation stopped