esakal | 'ऑक्‍सिजनवर बोलू काही..!'

बोलून बातमी शोधा

'ऑक्‍सिजनवर बोलू काही..!'
'ऑक्‍सिजनवर बोलू काही..!'
sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सध्या कोविडच्या आपत्तीत ऑक्‍सिजन तुटवडा जीवन मरणाचा विषय झाला आहे. या प्राणवायुचं वैद्यकीय महत्त्व, त्याची निर्मिती आणि वाहतूक या साऱ्यातलं अर्थकारण याविषयी...

ऑक्‍सिजन का लागतो?

ऑक्‍सिजनला प्राणवायू म्हटलं जातं. तो श्वासावाटे आत घेतला जातो. तो फुप्फुसातून रक्तात प्रवेश करतो आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहोचतो. तिथं ग्लुकोजसोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होते, म्हणजे अन्नाचं ऊर्जेत रुपांतर होतं. सजीवांच्या जगण्यासाठी ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. आता कोरोना किंवा अन्य संसर्गजन्य आजारांत सूक्ष्मजीवाचा संसर्ग फुप्फुसात वाढला, तर रक्तात ऑक्‍सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात. अशा वेळी नेहमीसारखा श्वासावाटे घेतला जाणारा ऑक्‍सिजन पुरेसा ठरत नाही. मग रुग्णांना शुद्ध ऑक्‍सिजनचा पुरवठा करणे भाग पडते.

कारखान्यातील ऑक्‍सिजन निर्मिती

हवेत जवळपास 21 टक्के ऑक्‍सिजन आणि म्हणजे 79 टक्के नायट्रोजन असतो. आता त्यातला ऑक्‍सिजन वेगळा करण्याची प्रक्रिया तंत्रज्ञानाने साध्य केली आहे. ही प्रक्रिया तशी गुंतागुंतीची असते. हवेचं दबावाखाली द्रवात रुपांतर केलं जातं. अशा द्रवीकृत हवेतले घटक वेगळे करणं सोपं जातं. त्यातून शुद्ध आणि द्रवरुपातला ऑक्‍सिजन किंवा नायट्रोजन मिळतो. हा द्रवीकृत म्हणजे लिक्विफाईड ऑक्‍सिजन रंगानं फिकट निळा असतो आणि अतिशय थंड असतो. त्याचं तापमान वजा 183 अंश सेल्सियस एवढं कमी असतं. अशा अतिथंड वायूंना "क्रायोजेनिक गॅसेस' म्हणतात.

हेही वाचा: आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना सांगलीत अटक

वाहतूक-साठवणूक कशी होते?

द्रवीकृत ऑक्‍सिजनची कारखाना ते हॉस्पिटल किंवा रिफिल टॅंकपर्यंत वाहतूक आव्हानात्मक असते. सांगली-कोल्हापूर, इस्लामपूर येथे छोटे छोटे रिफिल टॅंक आहेत. या प्रक्रियेत साधारणत: वीस टक्के गळती होते. छोटे सिलिंडर्स रुपाने ते रुग्णालये-उद्योगांना पुरवले जातात. काही हॉस्पिटल किंवा उद्योगात असा द्रवरूप ऑक्‍सिजन साठवण्यासाठी मोठे टॅंक असतात. नाशिक महापालिकेच्या हॉस्पिटलबाहेर असा टॅंक होता आणि त्याच्या गळतीमुळेच नुकताच मोठा अपघात घडला. लिक्विड ऑक्‍सिजन ज्वलनाला मदत करतो आणि त्यामुळे अशा द्रवरूप ऑक्‍सिजनमुळे अपघात होतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे क्रायोजेनिक टॅंकर वापरले जातात. कारखान्यात असा टॅंकर भरण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यानंतर हे टॅंकर प्रतितास 40 किलोमीटरच्या वेगानेच पळवावे लागतात. सध्या टॅंकर्सना अँब्युलन्स दर्जा देऊन त्यांना वाहतूक कोंडीत स्वतंत्रपणे वाट करून दिली जात आहे.

"तेल, लोह, वाहन उद्योगात ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालवण्यासाठी ऑक्‍सिजन वापरला जातो. मुंबईजवळचं तळोजा, पुणे आणि नागपूर अशा मोजक्‍याच ठिकाणी ऑक्‍सिजन प्रकल्प इंडस्ट्रीच्या गरजेनुसार आहेत. त्यातून राज्यात दररोज 1200 मेट्रीक टन ऑक्‍सिजनचं उत्पादन होतं. एरवी त्यापैकी पंधरा टक्के इतकी गरजच वैद्यकीय क्षेत्राची असते. सांगली जिल्ह्यात एरवी दोन टन इतकीच उद्योगांची गरज असते. आता जिल्ह्याची वैद्यकीय क्षेत्राची गरजच 35 ते 40 टन इतकी झालीय. एरवीचा 130 रुपयांचा सिलिंडर 600 वर पोहोचला आहे. आता मागणी वाढली म्हणून प्लांट उभा करणे शक्‍य नाही. कारण प्रकल्प उभारणीला किमान दीड दोन महिने लागतील. दैनंदिन तीस टन ऑक्‍सिजन निर्मितीचा प्रकल्प करायचा म्हटले, तर दोन कोटी रुपये लागतात. कोविडनंतर या प्रकल्पाची उपयुक्तता संपेल. त्यामुळे खासगीत उद्योजक पुढे येणार नाहीत. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा विचार करून आम्ही गेल्यावर्षी जिल्हाप्रशासनाला एमआयडीसीत जागा दिली तर आम्ही प्रकल्प उभा करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र साथ ओसरताच मागणीकडे दुर्लक्ष झाले."

- माधव कुलकर्णी, उद्योजक

हेही वाचा: कौतुकास्पद! 11 दिवसांच्या चिमुकलीची आई कोरोनाबाधित; मैत्रिणीने दिली मायेची ऊब

"सामान्यतः ऑक्‍सिजन पातळी 97 च्या वर असते. मात्र जेव्हा ती खालावत 85 पर्यंत येते तेव्हा रुग्णाला ऑक्‍सिजन द्यायची वेळ येते. अशावेळी ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत घेतली जाते. हे मशीन हवेतून ऑक्‍सिजन शुद्ध करून रुग्णांना पुरवतं आणि ते वापरणं तुलनेनं सोपं असतं. बाजारात त्याची किंमत साधारणत 40 हजार इतकी आहे. ती भाड्यानंही मिळतात. मात्र सर्वच रुग्णांना त्याद्वारे दिला जाणारा ऑक्‍सिजन पुरेसा ठरत नाही. त्यांना सिलिंडरनं किंवा पाईपनं होणाऱ्या ऑक्‍सिजनची गरज असते. मात्र परस्पर रुग्णांना यंत्रानं किंवा सिलिंडरनं ऑक्‍सिजन लावण्याचा निर्णय इतरांनी नव्हे तर डॉक्‍टरांनीच घ्यायला हवा. कारण शुद्ध स्वरुपातल्या ऑक्‍सिजनमुळे काही अपघातही होऊ शकतात. हॉस्पिटलमध्ये सध्या ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेटरचा खुबीने वापर करायला हवा. आमच्याकडे असे दोन मशिन्स आहेत. त्याचा वापर केल्याने आमच्या अतिदक्षता विभागाला पाच तासांसाठी पुरणारा ड्युरा सिलिंडर आठ तासांपर्यंत जात आहे."

- डॉ. अनिल मडके, श्‍वसनरोग तज्ज्ञ