सांगली जिल्ह्यातील खत गोदामांची समितीकडून चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्र परवाने नुतनीकरण आणि युरिया पुरवठ्याबाबत तक्रारी केल्या होत्या. परंतू या तक्रारींकडे जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी सोयीस्कर कानाडोळा केला.

सांगली ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्र परवाने नुतनीकरण आणि युरिया पुरवठ्याबाबत तक्रारी केल्या होत्या. परंतू या तक्रारींकडे जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी सोयीस्कर कानाडोळा केला. कृषी केंद्रांना पाठीशी घातल्याच्या तक्रारी समोर आल्या. थेट कृषी मंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील खत गोदामांच्या चौकशीचे थेट आदेशच समितीला दिलेत. चौकशी समितीकडून गोदामे तपासणीही सुरु झाली आहे. यात अनेक गोष्टींची चौकशी करावी लागणार आहे. 

गेल्या महिन्यात कृषी मंत्री दादा भुसे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांबाबत आणि युरिया पुरवठ्याबाबत तक्रारी केल्या. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात परवाना नुतनीकरण प्रकरणी एका लिपिकावर निलबंनाची कारवाई करुन त्याला बळीचा बकरा बनवले गेले होते. खतांच्या तक्रारींच्या सखोल चौकशीसाठी मंत्री श्री. भुसे यांनी सांगलीत पथक धाडले. सर्वस्तरावरून चौकशी सुरु झाली आहे. कार्यालयातील सर्वांचे जाबजबाब घेतलेत. जिल्ह्यातील खतांची मागणी आणि पुरवठा याबाबत सखोल तपासणी सुरु केली आहे. त्यानंतर पॉस मशिनचा रिर्पोट तपासला जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील खतांच्या गोदामाच्या तपासणीचे काम या पथकाने हाती घेतले आहे. 

दरम्यान, खत परवान्याबाबत थेट कृषी मंत्री दादा भुसे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे खत परवान्यांची तपासणी ही कराड, सांगली आणि कोल्हापूर भागातील चार ते पाच ठिकाणची आहे. या भागातील खतांच्या दुकानांचीच तपासणी सुरु केली आहे. याबाबत तपासणीची प्रक्रिया मोठी आहे. यात गोदामांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी तपासल्या जाणार आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry by Fertilizer Godown Committee in Sangli District