क्‍लासेस, कार्यालये, मल्टिप्लेक्‍स, मॉलची तपासणी 

बलराज पवार 
Monday, 22 February 2021

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे याबाबत आवश्‍यक ती खबरदारी घेण्याची सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

सांगली  : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे याबाबत आवश्‍यक ती खबरदारी घेण्याची सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या पथकाकडून मंगल कार्यालये, मल्टिपर्पज हॉल, लॉन, मल्टिप्लेक्‍स, मॉल, खासगी क्‍लासेस, हॉटेल, बझार, सिनेमागृह इत्यादी ठिकाणी तपासणी करण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वॉर्ड 16 क्रमांकमधील बारस्कर क्‍लासेसची तपासणी करून त्यांना नोटीस बजावण्यात आली. तसेच शहरामध्ये गर्दीची ठिकाणी असणाऱ्या सर्व आस्थापनांची तपासणी करून नोटीस बजावण्यात येणार आहेत. 

ज्या ठिकाणी कोविड प्रतिबंधक उपाययोजना दिसून येणार नाहीत अशा ठिकाणी प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व आस्थापना तसेच संस्थानी आपल्या कार्यालय, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा, येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल गनने तपासणी करावी व त्याचे रेकॉर्ड ठेवावे, सोशल डिस्टन्सचे अनुपालन करावे व संस्थेमध्ये दैनंदिन स्वच्छता ठेवावी. 

तसेच संस्थेमध्ये एकावेळी सर्व नियमांचे पालन करून पन्नासपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. याप्रमाणे सूचना सर्वाना देण्यात आल्या आहेत. 
यावेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे व दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर व स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे उपस्थित होते.
 

 

 

संपादन ः प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of classes, offices, multiplexes, malls