Belgaum : अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडून सुवर्णसौध परिसराची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडून सुवर्णसौध परिसराची पाहणी

अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडून सुवर्णसौध परिसराची पाहणी

बेळगाव : पुढील महिन्यात बेळगावात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या अनुषंगाने कायदा- सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) प्रताप रेड्डी यांनी बुधवारी (ता.१७) सुवर्णसौधला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्वाच्या सूचना केल्या.

१३ डिसेंबरपासून बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याचे सरकारने मागील महिन्यात निश्‍चित केले होते. मात्र विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने अधिवेशन लांबणीवर टाकण्यात आले. निवडणुकीनंतर अधिवेशन होण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) प्रताप रेड्डी यांनी सुवर्णसौधच्या अंतर्गत भागाची तसेच मुख्यंत्री कार्यालयाची सुरक्षा, सुवर्णसौधचा बाह्य परिसराची पाहणी केली. अधिवेशन काळात शेतकरी, कामगारवर्ग मागण्यांसाठी सुवर्णसौधवर मोर्चा घेऊन येत असतात. धरणे, अधिकारी- मंत्र्यांना घेराव सुवर्णसौधला वेढा असे प्रकारही घडत असतात. सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिसांची कुमक वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेत उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक सतीशकुमार, शहर पोलिस आयुत्त त्यागराजन, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी भाग घेतला.

२०१९ मध्ये अतिवृष्टी व महापूरामुळे उत्तर कर्नाटकात शेती व्यवसाय आणि सार्वजनिक मालमत्तेच्या हानीमुळे सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन न घेण्याचे ठरवून बंगळुरातच घेतले होते. २०२० मध्ये कोविडच्या उद्रेकामुळे बेळगावातील अधिवेशन सरकारने रद्द केले होते. आता तीन वर्षानंतर बेळगावात अधिवेशन होणार आहे.

बेळगावातील अधिवेशने ही निव्वळ चर्चेची गुऱ्हाळ ठरत असल्याची जनतेतून प्रामुख्याने शेतकरीवर्गातून ओरड होत असते. यंदाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकार कोणती भूमिका घेणार हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

loading image
go to top