महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे आहे असा आहे नियम वाचा....

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

दिल्ली, तमिळनाडूची सक्ती मागे; 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन 

बेळगाव : दिल्लीपाठोपाठ तमिळनाडूहून येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईनची अट मागे घेतली असून, केवळ महाराष्ट्राहून येणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईनची सक्ती कायम ठेवली आहे. 7 दिवस संस्थात्मक आणि 7 दिवस होम क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी स्तरावर 26 जूनला या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सुधारीत आदेश जारी केला. 

देशात विविध राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. पण, महाराष्ट्रात साथ वेगाने फैलावत आहे. त्याचा कर्नाटकावर परिणाम होत आहे. रुग्णांची संख्या येथे वाढत आहे. तसेच भविष्यात संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे महाराष्ट्राहून येणाऱ्यांसाठी निर्बंध कायम ठेवले आहे. सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईनची अट कायम ठेवली आहे. त्यानंतर सात दिवसांचे होम क्वारंटाईन व्हावे लागेल, असा उल्लेख आदेशात आहे. 

हेही वाचा- भारताच्या सैन्यदलात कोकणातील तरूणांची संख्या झपाट्याने होतेय कमी का ते वाचा.. -

महाराष्ट्राहून येणाऱ्यांना संस्थांत्मक क्वारंटाईन 

गेल्या आठवड्यामध्ये दिल्ली, तमिळनाडू येथून येणाऱ्यांसाठी 3 दिवस संस्थात्मक व  11 दिवस होम क्वरंटाईनची सक्ती करण्यात आली होती. पण, या नियमावलीत आता सुधारणा केली आहे. वरील दोन्ही राज्याहून येणाऱ्यांसाठी 14 दिवस होम क्वारंटाईनची सक्ती केली आहे. अत्यावश्‍यक सेवा आणि वाहतूक आणि वैद्यकीय उपचार संबधीत प्रवासासाठी अट शिथिल करण्यात आली आहे. पण, त्याबाबतचे दाखले सादर करणे जरुरी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Institutional quarantine for those coming from Maharashtra in belguam