जिल्हा प्रशानाला "साडेसाती'चा फेरा! 

विनायक लांडे
सोमवार, 20 जानेवारी 2020

सरकार जोपर्यंत रिक्त पदांची तड लावत नाही, तोपर्यंत नागरिकांच्या कामांना अपुऱ्या मनुष्यबळाच्या साडेसातीचा फेरा आड येणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नगर : वाढती लोकसंख्या, तक्रारींचा महापूर, त्यामुळे नागरिकांची कामे संथ गतीने, प्रभावहीन होत आहेत. त्यातच नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय मिळावा, हा एकच हेका लोकप्रतिनिधींचा असतो. दुसरीकडे, कोणत्याही सरकारचे कामकाज प्रभावी होणे हे सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहे. जनहितासाठी तयार झालेल्या योजना प्रत्यक्ष गावशिवारात पोचण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. प्रशासनात आज 1546पैकी 347 पदे रिक्त आहेत. 

कामाचा ताण 
सरकार जोपर्यंत रिक्त पदांची तड लावत नाही, तोपर्यंत नागरिकांच्या कामांना अपुऱ्या मनुष्यबळाच्या साडेसातीचा फेरा आड येणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध 347 पदे रिक्‍त आहेत. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. प्रशासकीय मुख्यालय, अशी जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख आहे. 

22 टक्के जागा रिक्त 
महसूल विभागाचा कणा असलेल्या या कार्यालयाशी जिल्ह्यातील बहुतांश कार्यालये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या जोडलेली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पुनर्वसन कार्यालय आदी ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदे रिक्त आहेत. प्रशासनातील 1546 पदे मंजूर आहेत. मात्र, यांपैकी 22.44 टक्के, म्हणजे 347 पदे रिक्‍त आहेत. 

निवृत्तीचा धडाका 
प्रशासनात कर्मचारी सेवानिवृत्त होण्याचा धडाका सुरूच असतो. मात्र, त्याबरोबरीने पदे भरली जात नाहीत. प्रशासनाचे कामाचे स्वरूप आणि मंजूर जागा यांचे प्रमाण पाहता, मुळातच मंजूर जागा कमी आहेत. एका कर्मचाऱ्याकडे असणारा कामाचा व्याप अन्य शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांकडे असणाऱ्या कामांपेक्षा अधिक आहे. एका कर्मचाऱ्याकडे अनेक प्रकारचे काम असल्याने, त्याचा सर्वच कामांवर परिणाम होतो.

दैनंदिन कामांचा निपटारा करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. काही विभागांतील कर्मचाऱ्यांना तर रात्री सात-आठ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून काम करावे लागते. या पार्श्‍वभूमीवर, रिक्‍त जागा भरण्याबरोबर काम आणि कर्मचाऱ्यांची संख्या यांचा आढावा घेऊन मंजूर पदांची संख्या वाढविण्याची गरज आहे. 

सीएएविरोधकांना हिंदू राष्ट्र सेना भिडणार  

कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम 
कामाच्या वाढत्या व्यापाने कर्मचाऱ्यांचा ताण-तणावही वाढत आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. वारंवार आजारी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याचे धोकादायक चित्र दिसू लागले आहे. पदांची संख्या कमी झाली तर त्याचा कामकाजावर आणखी विपरीत परिणाम होईल. 

प्रशासनातील पदांचा लेखाजोखा (मंजूर व रिक्त पदे अनुक्रमे) 
नायब तहसीलदार - 72-21 अव्वल कारकून 236-21. मंडलाधिकारी - 103,11. लिपिक 333- 110. तलाठी 586-103. वाहनचालक 28-08. शिपाई 156-61. पहारेकरी 17-05. स्वच्छक 15-07. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insufficient number of employees