"वॉर रुम'मध्ये बाधित सापडले, पण काम थांबलेले नाही...

अजित झळके 
Tuesday, 28 July 2020

"डोन्ट वरी, आम्ही ठीक आहोत. मी आणि सी.एस. (शल्य चिकित्सक) इथेच आहोत. नवी टीम नेमली आहे. वॉर रुमचे काम अजिबात थांबणार नाही...'' जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी "सकाळ'शी बोलत होते. 

सांगली : "डोन्ट वरी, आम्ही ठीक आहोत. मी आणि सी.एस. (शल्य चिकित्सक) इथेच आहोत. नवी टीम नेमली आहे. वॉर रुमचे काम अजिबात थांबणार नाही...'' जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी "सकाळ'शी बोलत होते. 

कोरोना वॉर रुममध्ये वीस कोरोना बाधित सापडल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया. पडद्याआड राहून युद्ध काळात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यायची तरी किती आणि कशी? या वॉर रुमशी दररोज शेकडो लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क येत असतो. कित्येक लोक थेट कोरोना रुग्णालयाशी निगडीत असतात. वॉर रुममध्ये कोरोना आला, याचा येथे धक्का बसण्यासारखी स्थिती नव्हती, कारण असे होणार, हे गृहीत धरूनच इथे काम सुरु आहे. 

जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहालगतच्या स्थायी बैठकीच्या कक्षात कोरोना वॉर रुम आहे. इस्लामपुरातील पहिला रुग्ण सापडल्यानंतर ती सुरु करण्यात आली. या ठिकाणी शासकीय विभागातील अनेक कर्मचारी, महिला कर्मचारी, शिपाई कार्यरत आहेत. येथे कोरोनाशी निगडीत प्रत्येक बाब नोंदवली जाते. जिल्ह्यात आला कोण, कधी आला, त्याच्या संपर्कात कोण आले, किती बाधित झाले, मृत्यू किती झाले... सबकुछ. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सीईओ जितेंद्र डुडी यांच्यासह सर्वच अधिकारी येथील माहितीच्या आधारावर महत्वाचे निर्णय घेतात. राज्य शासनाकडे सारे अपडेट येथूनच जातात. इतकी महत्वाची जबाबदारी येथे पार पाडली जाते. 

या कक्षात एका डॉक्‍टरला कोरोनाची बाधा झाली आणि तेथेच स्पष्ट झाले की संख्या मोठी असणार. हे डॉक्‍टर येथे महत्वाची जबाबदारी बजावत होते.

कोरोना रुग्णालयाशी संपर्कात असलेल्या अनेकांशी त्यांचा थेट संपर्क असायचा. त्यामुळे धोका टाळायचा ठरला तरी टाळणे कठीण होते. सहाजिक येथे वीस लोक कोरोना बाधित सापडले आहेत. पण म्हणून काम थांबलेले नाही. येथे नवी टीम तातडीने नेमण्यात आली आहे. त्यांचे काम सुरु झाले आहे. या कक्षात नेमले म्हणून घाबरलोय, असे कुणीही म्हणत नाही. हे सारे पडद्याआडचे योद्‌ध्ये आहेत. 

""वॉर रुमचे काम अत्यंत जबाबदारीचे आहे. सर्व लोक 24 तास तेथे ड्युटी करत आहेत. त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे आमची जबाबदारी आहे. त्यात हलगर्जीपणा होणार नाही.'' 
- प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, सांगली. 

अनावश्‍यक लोक अडवले 
जिल्हा परिषदेत आता लोकांना सहज जाता-येता येणार नाही. त्यासाठी एक प्रवेशव्दार बंद ठेवण्यात आले आहे. मुख्य प्रवेशव्दारावर चौकशी करूनच आत प्रवेश दिला जात आहे. महत्वाचे काम नसेल तर कुणीही इकडे फिरकू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. आजपासून येथे कोरोना ड्युटी वगळता इतरांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interrupted in "War Room", but work doesn't stop ...