इतिहास यंत्रमागाचा: हातमागामुळे वस्त्राेद्योगनगरीची ओळख

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बेळगावात व्यवसाय; संकटांशी सामना करत आजही तग धरून

वडगाव (बेळगाव): कुंदानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगाव शहराची ओळख वस्त्राेद्योगनगरी म्हणूनही झाली आहे. येथील शहापुरी साडीने संपूर्ण देशातच प्रसिद्धी मिळविली आहे. शहापूरसह वडगाव, खासबाग, भारतनगर, जुने बेळगाव आदी भाग साडी व्यावसायिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या भागात हातमागापासून या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. पर्यायाने बेळगावातही वस्त्रोद्योग व्यवसायाची सुरवात झाली. कालांतराने यंत्रमाग आणि सध्या अत्याधुनिक अशा रॅपीयर मागाने या वस्त्रोद्योग (साडी व्यवसाय) क्षेत्राची वाटचाल सुरू आहे.

 

बेळगावच्या वस्त्रोद्योगाची ख्याती देशभरात झाली आहे. मात्र, येथील व्यवसायाने इतक्‍या वर्षात अनेक चढउतार पाहिले. संकटांशी सामना करत हा उद्योग आजही तग धरून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९३२-३३ दरम्यान खासबाग, वडगाव या भागात हातमाग होते. यावर रेशीम व गर्भरेशीम खण तयार होत असत. त्याकाळी हा व्यवसाय मंदगतीने चालत असे. रेशमीप्रमाणे सुती खणही तयार होत असत. या खणांची बाजारपेठ त्याकाळी मुंबईला होती. तर शहापुरी खणांची बाजारपेठ प्रसिद्ध झाली. १९६५ च्या दरम्यान या उद्योगाची वाढ झाली. शहापूर, खासबाग, वडगावपुरता मर्यादित असणाऱ्या या व्यवसायाची याकाळात आसपासच्या खेडेगावात वाढ होत गेली. खणांचा व्यापार करण्यात त्यावेळी मारवाडी समुदायातील व्यापारी प्रसिद्ध होते. 

हातमागानंतर याभागात स्वयंचलित माग घालण्यात आले. हा व्यवसाय म्हणजे बिन पावसाचे पीक असे त्याकाळी म्हटले जायचे, तर हा व्यवसाय राजस धंदा म्हणून प्रसिद्धी पावला होता. कारण, याकाळात हातमाग व्यवसाय करणाऱ्या विणकर कुटुंबीयांचा चरितार्थ चांगला चालत असे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. हातमागावर तयार झालेले खण ग्रामीण भागातून शहापूर बाजारपेठेत आणले जायचे. येथून मुंबई, पुणे, सातारा यासह हुबळी येथील काही व्यापारीही या खणांची खरेदी करत असत. त्याकाळी कर्नाटकसह महाराष्ट्रातही या शहापुरी खणांना प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, कालांतराने काही कारणामुळे हातमागाचा व्यवसाय कमी होत गेला अन्‌ त्याची जागा स्वयंचलित हातमागाने घेतली. 

 

हेही  वाचा- सेना व भाजप आमने-सामने:  आता होणार सख्ख्या जावांमध्ये सामना! -

स्वयंचलित हातमागाचा व्यवसायही त्यावेळी बराच वाढला. पूर्वीच्या हातमागापेक्षा या स्वयंचलित हातमागावर कमी वेळेत जादा उत्पादन मिळत असे, यामुळे या मागांची संख्याही वाढली. पर्यायाने विणकर कामगारांची संख्याही वाढली.

हातमागामुळेच अर्थार्जन
पूर्वीच्या काळी हातमाग हा घरगुती व्यवसाय असल्याने कुटुंबातील जवळजवळ सर्व सदस्यांना काम मिळत असे. यामुळे याकाळात व्यवसायवृद्धी झाली. या व्यवसायास कित्येक वर्षे मंदी आली नव्हती. हा उद्योग शहरातील काही भागांसह प्रामुख्याने आसपासच्या ग्रामीण भागात तेजीत चालला होता.
 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Introduction of textile industry and handloom history in belgaum