सिंचन योजनेचे पंप सुरु ; पुराचे पाणी निघाले दुष्काळी भागात 

अजित झळके 
Tuesday, 18 August 2020

एरवी राजकीय प्रचार सभांत मोठ्या आवाजात घोषणा करून टाळ्या मिळवण्याचा विषय आज प्रत्यक्षात आला. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी थेट दुष्काळी भागाला देऊ, अशी घोषणा अवतरली.

सांगली : एरवी राजकीय प्रचार सभांत मोठ्या आवाजात घोषणा करून टाळ्या मिळवण्याचा विषय आज प्रत्यक्षात आला. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी थेट दुष्काळी भागाला देऊ, अशी घोषणा अवतरली.

म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे पंप सुरु करून पाटबंधारे विभागाने "करून दाखवलं'. या पाण्याने जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी भागातील तलाव भरून घेतले जाणार आहे. हे पाणी थेट शेतीला, पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यास फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. 

कृष्णा काठावर एकीकडे महापुराची भिती दाटली असताना दुसरीकडे दुष्काळ पडू नये, अशी प्रार्थना करणारा भाग सुखावला आहे. कोयना धरणातून 56 हजार आणि वारणा धरणातून 16 हजार क्‍यूसेकने विसर्ग सुरु आहे. पुराचे पाणी वाहून जाते, समुद्राला मिळते, ते उचला आणि दुष्काळी भागाला द्या, ही मागणी खूप जुनी आहे. गेल्यावर्षी महापुराने हाहाकार माजवल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यात हाच मुद्दा केंद्रस्थानी राहिला. राज्य आणि केंद्रातील बड्या नेत्यांनी त्यावर फोकस केले. ते आज प्रत्यक्षात अवतरले. 
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मार्चमध्ये एका बैठकीत पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्याची योजना बनवण्याचे आदेश दिले होते. पूर्ण नियोजन व तयारी करण्यात आली. ती संधी आता साधली गेली. आज म्हैसाळ आणि टेंभू योजना सुरु करण्यात आली. म्हैसाळ योजनेतून तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ तर टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सांगोला तालुक्‍यातील तलाव भरून घेतले जाणार आहेत. 
दरम्यान, ताकारी व आरफळ योजनेतून पाणी सोडले जाणार नाही. पूर्व नियोजनात ताकारी योजनेतून पाणी सोडले जाण्याचे संकेत देण्यात आले होते. 

दोन्ही योजनांचे पंप आज सुरु करण्यात आले. दुष्काळी तालुक्‍यातील तलावांची क्षमता पाहून, गरज पाहून त्यात पाणी साठवले जाईल. सहा तालुक्‍यांना त्याचा फायदा होणार आहे. ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील तलावांत पाणी सोडण्याची गरज नाही. '' 

- हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrigation scheme pump started