esakal | "आयर्विन'चे अडथळा कुंपण हटवले; आंदोलनानंतर दुचाकींना मुभा

बोलून बातमी शोधा

Irwin bridge's barrier fence removed; two-wheelers allowed after agitation}

सांगली येथील आयर्विन पुलावरून दुरुस्तीकाळात दुचाकी वाहतुकीला मुभा द्यावी, अशी मागणी करीत आज सांगलीवाडीतील नागरिकांनी आंदोलन केले.

paschim-maharashtra
"आयर्विन'चे अडथळा कुंपण हटवले; आंदोलनानंतर दुचाकींना मुभा
sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली ः येथील आयर्विन पुलावरून दुरुस्तीकाळात दुचाकी वाहतुकीला मुभा द्यावी, अशी मागणी करीत आज सांगलीवाडीतील नागरिकांनी आंदोलन केले. अखेर नगरसेवक अजिंक्‍य पाटील यांनी पुढाकार घेत पुलावरून दुचाकी वाहतूक सुरू करण्यासाठीची व्यवस्था करून दिली. दरम्यान या पुलाच्या दुरुस्तीकामासाठी पुढील महिनाभर वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. 

पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट पूर्ण झाले आहे. पुलाची स्थिती मजबूत आहे. किरकोळ परंतु गरजेच्या अशा डागडुजीसाठी महिनाभर पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात पदपथाच्या अँगलचे वेल्डिंग, झाडेझुडपे काढणे, दोन्ही बाजूच्या पदपथाचे स्लॅब अशी कामे आहेत. पुलावरील वापरात नसलेली पाण्याची पाईपलाईन काढून घ्यावी यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. काम सुरू असताना अपघाताची शक्‍यता विचारात घेऊन वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. महिनाभरात पूल पूर्ववत वाहतुकीसाठी खुला होईल. असे शाखा अभियंता एस. एच. मुजावर यांनी "सकाळ'ला सांगितले. 

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगलीकरांच्या सेवेत असलेल्या आयर्विन पुलावरील वाहतूक प्रथमच प्रदीर्घकाळ बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीवाडीकरांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. सांगलीत प्रवेशासाठी त्यांना पाच किलोमीटरचा फेरा पडत आहे. गरीब कष्टकरी मंडळींना त्यासाठीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. पर्यायी बायपास पुलावरून वाहतूक वळवली असली तरी तेथे कोंडी होत आहे. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात वाहतूक नियंत्रित होत नसल्याने अपघात होत आहेत. काही नागरिक बंधाऱ्यावरून जात आहेत. मात्र तेथून वाहतूक करणे धोकादायक आहे. जीव मुठीत घेऊन महिला मुले बंधाऱ्यावरून जात आहेत. 

अधिकाऱ्यांनी काम वेळेत पूर्ण करावे
सांगलीवाडीतील नागरिकांसाठी किमान दुचाकी वाहतुकीची मुभा द्यावी अशी आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. तात्पुरती वाहतूक आज सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी काम वेळेत पूर्ण करावे.

- अजिंक्‍य पाटील, नगरसेवक 

अतिक्रमणे काढून वाहतूक सुलभ करा
तूर्त दुचाकी वाहतूक सुरू करावी. इस्लामपूरकडील वाहतूक पेठ टोलनाक्‍यापासून बायपास पुलाकडे संपूर्णपणे वळवावी. या मार्गावर वाहतूक पोलिसांनी शिस्त लावण्यासाठी जागोजागी उपस्थिती लावावी. बायपासकडे येणाऱ्या सांगलीतील सर्व मार्गावरील अतिक्रमणे काढून वाहतूक सुलभ करावी.

- दिलीप पाटील, माजी नगरसेवक 

संपादन : युवराज यादव