इस्लामपुरच्या मुख्याधिकाऱ्यांची पुण्याला बदली !

धर्मवीर पाटील
Wednesday, 12 August 2020

पालघर नगरपालिकेत मुख्याधिकारी असलेले अरविंद माळी यांची वर्णी

इस्लामपूर (सांगली) : गेले वर्षभर शहरात आपल्या कामाची वेगळी छाप पाडून आणि सातत्याने चर्चेत राहिलेल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या बदलीची अखेर आज 'ऑर्डर' आली. काल रात्री उशिरा हे आदेश नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. पवार यांच्या बदलीची गेले आठवडाभर शहरात जोरदार चर्चा सुरू होती. मुख्याधिकारी सौ. पवार यांची पुणे महानगरपालिका मध्ये सहाय्यक आयुक्तपदी बढती झाली आहे. इस्लामपूर पालिकेसाठी पालघर नगरपालिकेत मुख्याधिकारी असलेले अरविंद माळी यांची वर्णी लागली आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली होऊन प्रज्ञा पवार याठिकाणी रुजू झाल्या. इस्लामपूर पालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्याधिकारी म्हणून त्यांची नोंद झाली. त्या आल्या तेव्हा भाजपची सत्ता होती. आणि पालिकेतही भाजप समर्थक विकास आघाडी सत्तेत असल्याने भाजप नेत्यांनी त्यांना खास प्रयत्न करून आणल्याची चर्चा होती. अगदी सुरवातीच्या काळातच त्यांनी अद्याप कामकाजाला सुरवात केली. त्याच दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये राज्यातील सत्ताकारणात बदल होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आली आणि इस्लामपूर मतदारसंघाचे नेते जयंत पाटील यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आली. या काळात सौ. पवार यांच्या बदलीच्या चर्चेला ऊत आला होता.

हेही वाचा- महापुरात पडलेलं घर 95 हजारात घर बांधता येतं का ? -

दरम्यान मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना विषाणू संसर्गाची महाराष्ट्रातील सुरवात इस्लामपूर शहरातून झाली. एकावेळी सुमारे 26 लोक कोरोनाबाधित होते, त्यामुळे शहर देशभरात चर्चेत आले. देशातील महत्त्वाचे हॉटस्पॉट म्हणून शहराकडे सर्वांच्या नजरा होत्या. या कामात मुख्याधिकारी पवार यांनी दिवसरात्र झटून प्रयत्नांची पराकाष्ठा करत विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे शहरात त्यांच्या कामाचे कौतुक झाले. 'लेडी सिंघम' म्हणून त्या चर्चेत आल्या. याच काळात राष्ट्रवादीचे नगरसेवक खंडेराव जाधव आणि त्यांच्यात झालेल्या वादावादीमुळे त्या आणखी चर्चेत आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्या सहकार्य करत नसल्याची नगरसेवकांची तक्रार होती.

हेही वाचा-रस्त्यासाठी महिला-मुलांसह ग्रामस्थ रस्त्यावर -

"माझ्या बदलीसंदर्भात मी स्वतः मंत्री जयंत पाटील यांच्याकडे विनंती केली होती. सर्वांना विश्वासात घेऊन कुणा एकाची बाजू न घेता वर्षभरात शहरात चांगले व तटस्थपणे काम करू शकल्याचा आनंद आहे."
प्रज्ञा पोतदार-पवार.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Islampur Municipality Chief Pragya Potdar Pawar Promotion as Assistant Commissioner in Pune Municipal Corporation